क्रीडारत्नागिरी

तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेतील गोल्डन बॉय संगम चव्हाणची उद्या गणपतीपुळे येथे रंगणार भव्य दिव्य विजयी मिरवणूक!

गणपतीपुळे दि. १ (वैभव पवार) :- नागालँड कोहिमा येथील पोलीस कॉम्प्लेक्स चुंबकेदमा या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील १८ किलो वजनी गटामध्ये रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयातील इ.६ वीच्या वर्गात शिकत असलेल्या संगम सुयोग चव्हाण याने सुवर्णपदक जिंकून मालगुंड शिक्षण संस्थेत सुवर्ण अक्षरांनी ऐतिहासिक नोंद केली आहे. संगम ची राष्ट्रीय पातळीवरील ही कामगिरी संपूर्ण मालगुंड आणि गणपतीपुळे वासियांसाठी अभिमानाची व गौरवास्पद ठरली आहे.

मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे संगमने राष्ट्रीय पातळीवर ही सर्वोच्च उल्लेखनीय व सरस कामगिरी केल्याबद्दल समस्त गणपतीपुळे येथील ग्रामस्थांच्या वतीने त्याची रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य दिव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे नगरीत संगम चे जोरदार भव्य दिव्य स्वागत संपूर्ण गणपतीपुळे गाववासिय आणि पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. यातील विजयी मिरवणुकीचे आयोजन गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींचे मंदिर ते ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे मंदिर या ठिकाणापर्यंत सायंकाळी पाच ते सात या वेळेत करण्यात आले आहे.

या विजयी मिरवणुकीचा समारोप ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात होणार असून याच ठिकाणी संगमचा समस्त गणपतीपुळे गावाच्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत संगम चव्हाण याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले स्थान मिळवले होते.

सर्वसामान्य कुटुंबातील अवघ्या १२ वर्षाचा हा मुलगा मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्ती प्रमाणे आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बरोबरच आपले गुरुवर्य प्रशिक्षक रूपेश तावडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दर्जेदार आणि लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन करत कु. संगम चव्हाण याने मालगुंड शिक्षण संस्थेचे आणि गावाचे नाव देशपातळीवर चमकवले आहे.

संगम चव्हाण याचे प्रशिक्षक रूपेश तावडे हे स्वतः तायक्वांदो ब्लॅक बेल्ट विजेते आहेत. प्रशिक्षक रूपेश तावडे हे मुंबई युनिव्हर्सिटीचे सुवर्णपदक विजेते असून तायक्वांदो क्रीडा प्रकारात ते खेळाडू राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या या शिष्याला आपल्या सारखे बनावे यासाठी त्यांची तळमळ आणि धडपड वाखाणण्याजोगे आहे.

सुवर्ण पदक विजेत्या कु‌. संगम चव्हाण याने राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल कु. संगम व. मार्गदर्शक प्रशिक्षक रूपेश तावडे यांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे व उपक्रमशील चेअरमन सुनिल ऊर्फ बंधू मयेकर ,उपाध्यक्ष विवेक परकर ,सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक रोहित मयेकर, संचालक किशोर पाटील तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक बिपीन परकर ,पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा तायक्वांदो अध्यक्ष व्यंकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, संजय सुर्वे, मयूर घेतले, राकेश जाधव, तसेच तालुका आणि जिल्हातील तायक्वांदो अकादमीचे प्रशिक्षक व सर्व खेळाडू व पदाधिकारी तसेच राज्य तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे आदींनी खास अभिनंदन केले.

कु.संगम चव्हाण याने प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर कमी वयात तायक्वांदो क्रीडा प्रकारात मिळवलेलेल्या सुवर्ण पदकाने क्रीडा क्षेत्रात मालगुंड एज्युकेशन सोसायटीची मान अभिमानाने उंचावली असल्याची गौरवोद्गारपर प्रतिक्रिया मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान,गणपतीपुळे येथे दोन नोव्हेंबर रोजी संगमच्या भव्य दिव्य स्वागत आणि विजयी मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतील गणपतीपुळे, मालगुंड, निवेंडी, भगवतीनगर, भंडारपुळे या गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button