रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरु  

रत्नागिरी दि. १८ : जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत “कुष्ठरुग्ण शोध मोहीम “अभियान राबविण्यात येणार असून,2027 पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात “शून्य कुष्ठरोग प्रसार” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करीत आहे. या अभियानासाठी आवश्यक विभागीय समन्वय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी दालनात जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप,वैद्यकीय अधिकारी(कुष्ठरोग) डॉ परवेज पटेल, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे यांच्यासह, मनपाचे वैद्यकीय अधिकारी, तसेच सहायक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयातील सर्व अवैद्यकीय पर्यवेक्षक उपस्थित होते.

जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा,अशा सूचना त्यांनी दिल्या व या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करणार आहेत.सुमारे 13 लाख 47 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यासाठी 1153 शोध पथक तयार करण्यात आली आहेत. 236 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.प्रत्येक पथकात एक आशा व एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे.जिल्ह्यातील जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे,प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे ,हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे :

त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे.

त्वचा जाड, तेलकट किंवा गाठीदार होणे.

कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे.

डोळे पूर्णपणे बंद करता न येणे.

तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा किंवा जखमा होणे.

हात व पायाची बोटे वाकडी होणे, मनगटापासून लुळे पडणे.

थंड-गरम संवेदना न जाणवणे.

हातातून वस्तू गळून पडणे, चालताना चप्पल गळून पडणे.

अभियानादरम्यान शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, तसेच कुष्ठरोगाची चिन्हे, लक्षणे, मोफत उपचार आणि समज-गैरसमज याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.आकाशवाणी वर मोहिमेबद्दल व आजाराबद्दल माहिती दिली आहे.गावपातळीवर दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना अभियानाची माहिती देण्यात येणार आहे,तसेच सर्व समाज माध्यमांवर याबाबत जनजागृतीपर प्रसार केला जात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

-(डॉ अनिरुद्ध आठल्ये), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परीषद रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button