रत्नागिरी

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संगम चव्हाणच्या पाठीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली कौतुकाची थाप!

गणपतीपुळे दि. १२ (वैभव पवार) : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावचा सुपुत्र, राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेतील चॅम्पियन तथा गोल्डन बॉय कु.संगम सुयोग चव्हाण याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कोतवडे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख स्वप्निल उर्फ तारक मयेकर यांच्या शिफारसीद्वारे आणि कोतवडे जिल्हा परिषद गटाचे युवासेना विभागप्रमुख अमित घनवटकर व गणपतीपुळे येथील शाखाप्रमुख महेश चव्हाण यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कौतुकाची थाप देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आगामी काळात प्रत्येक स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व मदतीसाठी कायमच पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याचे सांगितले.

संगम चव्हाण याने “मूर्ती लहान पण कीर्ती महान”या उक्तीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेत लक्षवेधी व चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आपल्या जिद्द, चिकाटी आणि प्रचंड दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने १४ वर्षाच्या वयोगटात ही कामगिरी केली आहे. या त्याच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे संपूर्ण गणपतीपुळे गावाचे नाव आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे.

भविष्यात संगम हा एक सर्वोत्तम दर्जेदार खेळाडू म्हणून नावारूपास येणार आहे. त्याची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याने त्याच्या उत्तुंग यशाची दखल घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन विशेष सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, राजन शेट्ये आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button