सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालय या श्रेणीत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्राप्त केला ५ वा क्रमांक
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांचा ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम

रत्नागिरी दि. २६ :- महाराष्ट्र शासनाचे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रातील ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये “सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय” या वर्गवारीत ५ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (Quality Council of India – QCI) या संस्थेमार्फत करण्यात आले. या मूल्यमापनाच्या आधारे विविध श्रेणींतील उत्कृष्ट शासकीय कार्यालयांची निवड करण्यात आली असून, त्याचे निकाल दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर करण्यात आले.
१५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे खालील नमूद सात महत्त्वाच्या निकषांवर शासकिय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते.
1) कार्यालयाची अधिकृत वेबसाईट,
2) ‘आपले सरकार’ प्रणालीचा वापर,
3) ई-ऑफीस प्रणाली,
4) कार्यालयीन डॅशबोर्ड,
5) व्हॉट्सऍप चॅटबॉटचा वापर,
6) शासकीय कामकाजात AI व Blockchain तंत्रज्ञानाचा वापर व
7) GIS तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वरील सर्व निकषांची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात प्रभावी अंमलबजावणी करून वापर करण्यात येत आहे.
या सामान्यीकृत व प्रमाणित मूल्यमापनात एकूण 200 गुणांपैकी 144.25 गुण मिळवत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने महाराष्ट्रातील 34 पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये (सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालय) या श्रेणीत राज्यात 05 क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे योगदान देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी अभिनंदन केले आहे तसेच भविष्यातही ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात आला आहे.



