रत्नागिरी

जैतापूर येथे नागरी संरक्षण दल प्रशिक्षण शिबिराला उत्साही प्रतिसाद

जैतापूर दि. ७ :- भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार आणि नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिर जैतापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण दि. ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येत असून, या उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा उपनियंत्रक अधिकारी ले. कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये जैतापूर व परिसरातील गावांतील नागरिक आणि स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले आहेत. स्वयंसेवकांना नागरी संरक्षणाची मूलभूत संकल्पना, आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण, प्राथमिक उपचार, बचावकार्य तसेच संकट काळात नागरिकांचे संरक्षण याबाबत सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे.

या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी आणि मास्टर ट्रेनर अक्षय जाधव हे करत असून, ते प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सराव आणि मार्गदर्शन देत आहेत.

प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या प्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि जैतापूर ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडवीरकर, उपसरपंच मीनल मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर करगुटकर, रुपेश करगुटकर ग्रुप ग्रामपंचायत दळे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष जब्बार काझी, तसेच त्रिवेणी महिला संघाचे व्यवस्थापक आणि पत्रकार राजन लाड उपस्थित होते.

शिबिरासाठी काझी मल्टीपर्पज हॉल, दळे जैतापूर येथे वर्ग सुरू असून, प्रशिक्षण सत्रांमध्ये जैतापूर, दळे, नाटे, मोगरे या गावांतील स्वयंसेवक सक्रियपणे सहभागी होत आहेत. या प्रशिक्षणामुळे स्थानिक स्तरावर आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षम, सजग आणि संघटित स्वयंसेवक तयार होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button