एसटी कर्मचाऱ्यांकडून, एसटीला साथ देणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान
रा. प. रत्नागिरी आगार चालक-वाहक कृतज्ञता सोहळा

रत्नागिरी दि. ३१ :- रा. प. रत्नागिरी आगारातील चालक-वाहकांतर्फे ग्रामीण भागात रात्र वस्तीच्या ठिकाणी चालक-वाहकांना वर्षानुवर्षे सोयी-सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामस्थांचा कृतज्ञता सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यास ना. उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून सर्व मान्यवरांचा सन्मान केला. एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून, ती महाराष्ट्राच्या जनजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ग्रामीण भागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी जेव्हा एसटीच्या चालक-वाहकांना आधार दिला, तेव्हा ही सेवा खऱ्या अर्थाने “लोकसेवा” बनली.
आपल्या राज्यात दरवर्षी जवळपास पन्नास लाख प्रवाशांची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आवश्यक सुविधा व सहकार्य देणे ही आपली जबाबदारी आहे, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.
कार्यक्रमात ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की, “ग्रामपंचायतीतील कोणतीही बस सेवा बंद करताना स्थानिक सरपंचांचा विश्वास घेऊन निर्णय घ्या. एसटी ही लोकांच्या भावनांशी जोडलेली सेवा आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय हा लोकाभिमुख असावा.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळाली आहे. शासनाच्या पाठबळावर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर ही सेवा अधिक सक्षम होत आहे.
ग्रामस्थ, सरपंच आणि अधिकारी, सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी सेवा अधिक कार्यक्षम आणि जनतेच्या हिताची राहील, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.



