श्री रामदरबार प्रतिष्ठान गोळप आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार

रत्नागिरी दि. ३१ :- श्री रामदरबार प्रतिष्ठान गोळप आयोजित कै. अनंत रघुनाथ काळे यांच्या स्मृती( कार्तिक शुद्ध अष्टमी) निमित्त सुरु केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच हे नववे वर्ष होते.
अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवत स्वतः आणि ज्या संस्थामध्ये काम करतो तिथे विविध सामाजिक उपक्रम जबाबदारी घेऊन सुरु केले. वडिलांच्या स्मृती दिनाचे निमित्त बनवून त्यांची आठवण जागवावी आणि त्यातून लोकांसाठी व्यासपीठ निर्माण करावे या विचाराने वक्तृत्व स्पर्धा घेण्याचं डोक्यात आलं. २०१७ साली पहिल्यांदा गोळप ग्रामपंचायत मर्यादित वक्तृत्व स्पर्धा तीन स्पर्धकांच्या सहभागाने सुरुवात केली. त्यावेळी मनाशी ठरवलं आणि बोलुनही दाखवलं होतं की भविष्यात गोळपच्या या स्पर्धा ब्रँड बनवू. तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि भविष्यात राज्यातून स्पर्धक गोळप मध्ये या स्पर्धेसाठी येतील. नंतर स्पर्धा गोळप दशक्रोशी, नंतर तालुकास्तरीय आणि गेली पाच वर्ष जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सुरु केल्या. आता जिल्हाभरातून स्पर्धक आल्यावर समाधान वाटतं. स्पर्धा सुरुवातीला दोन गटात घेतल्या होत्या मात्र शालेय गटात स्पर्धकांचा उत्साह पाहून आता एकाच खुल्या गटात स्पर्धा घेतो. इच्छा अशी असते कोणत्याही वयाच्या स्पर्धकाने दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर आपले विचार, मत मांडावे. पहिल्या वर्षीपासून विषयसुद्धा खूप विचार करून निवडण्याचा प्रयत्न करतो की स्पर्धेकांना त्यावर अभ्यास करून विचार करून बोलावे लागेल. आज या वर्षीची स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सावर्डे, चिपळूण, देवरुख, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, पावस, गोळप इ. गावातील स्पर्धक होते. स्पर्धकांनी खूप उत्तम भाषणे केली. परीक्षक म्हणून प्रा. जयंत अभ्यंकर यांनी उत्तम काम पाहिले.
तसेच स्पर्धकांना उपयुक्त मार्गदर्शन केले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले. स्पर्धेनंतर स्पर्धक आणि उपस्थिताना पोटभर अल्पोपहार आणि तालुक्याबाहेरील बक्षीस न मिळालेल्या सहभागी स्पर्धेकांना छोटीशी रोख रकमेची भेट देऊन स्पर्धा संपली. स्पर्धा आयोजन जास्तीतजास्त चांगले करण्याचा प्रयत्न असतो. मात्र स्पर्धक, पालक यांचेमुळे स्पर्धा उत्तम पार पडली. अर्थात कुटुंबीय आणि मित्रमंडळींची मोलाची साथ असतेच!आता पुढच्या वर्षी कार्तिक शुद्ध अष्टमीला वक्तृत्व स्पर्धा वर्ष दहावे.
स्पर्धेचा निकाल-
प्रथम क्रमांक – कु. रोजीना मुसा साबळे, सावर्डे
द्वितीय क्रमांक – कु. वेदांती राव, देवरुख
तृतीय क्रमांक – श्री. जयंत फडके, जांभूळ आड, मेर्वी
उत्तेजनार्थ प्रथम – सौ. प्राची राव, देवरुख
उत्तेजनार्थ द्वितीय – सौ. त्रिपुरा देवळेकर, कोळंबे, संगमेश्वर
उत्तेजनार्थ तृतीय – कु. सानिया उदय लिंगायत. वाटुळ, राजापूर.
विशेष उत्तेजनार्थ – कु. तीर्था पावसकर, पावस.
अविनाश काळे, गोळप , मो. ९४२२३७२२१२



