गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्रा. पंकज घाटे यांनी घेतली पीचएडी पदवी

रत्नागिरी दि. १९ :- येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासू प्राध्यापक पंकज घाटे यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण कोकणातील सामाजिक-राजकीय संक्रमण (१८५७ ते १९४७) हा प्रबंधाचा विषय आहे. ब्रिटीश राजवटीखालील दक्षिण कोकणातील समाज, प्रशासन आणि राजकारणातील बदलांचा सखोल मागोवा घेतला आहे.
दक्षिण कोकण अर्थात् रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा ब्रिटिशकाळातील घडामोडींचा एकत्रित इतिहास आजवर लिहिला गेला नव्हता. त्यामुळे प्रबंधात विस्मृतीत गेलेले आणि आजवर अप्रकाशित राहिलेले इतिहासाचे पैलू उलगडले आहेत. हे संशोधन कल्याणच्या बी. के. बिर्ला (स्वायत्त) महाविद्यालयातील प्रा. डॉ. स्वप्ना समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापिठाला सादर करण्यात आले. ब्रिटिशसत्तेच्या आगमनानंतर कोकणातील समाजजीवन, अर्थव्यवस्था आणि राजकीय जाणीवा हळूहळू बदलत गेल्या. १८७२ ते १९४१ या कालावधीत झालेल्या जनगणनेचे अहवाल, सरकारी कागदपत्रे आणि पुराभिलेखागारातील गोपनीय पुराव्यांच्या आधारे हा अभ्यास केला आहे. यात दक्षिण कोकणातील तत्कालीन लोकसंख्येतील बदल, कोकणाबाहेर होणारे स्थलांतर आणि वर्गसंघर्षांचे स्वरूप उलगडले आहे. खोती पद्धत, शिक्षणाचा प्रसार, मिशनऱ्यांचे कार्य, दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी समाजावर घडवलेले दूरगामी परिणाम प्रबंधात तपशीलवार मांडले आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण कोकणात इंग्रजी शिक्षणाची सोय, वृत्तपत्रे आणि ग्रंथालयांच्या स्थापनेमुळे सामाजिक बदल होण्यास हातभार लागला. यातून नवा मध्यमवर्ग तयार झाला आणि अभिजन-बहुजन समाजातील लोकांमध्ये आत्मभान निर्माण होऊ लागले. त्याचे दूरगामी परिणाम काय झाले, याचा अभ्यास या प्रबंधात करण्यात आला आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले.



