मालगुंड ग्रामपंचायत येथे पोषण पंधरवडा कार्यक्रम!

गणपतीपुळे दि. १९ (वैभव पवार) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोन रत्नागिरी अंतर्गत बीट मालगुंड- १ च्या वतीने पोषण पंधरवडा कार्यक्रम ग्रामपंचायत मालगुंड येथे सरपंच श्वेता खेऊर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली पार पाडला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात भगवतीनगर अंगणवाडीसेविका ममता नेवरेकर यांनी आपल्या मधुर आवाजात सुंदर असे स्वागत गीत गाऊन वातावरण मंगलमय केले. यानंतर मालगुंड बीट एकच्या मुख्यसेविका संपदा भागवत यांनी आहार व आरोग्य आणि शासनाच्या योजना याबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. तसेच मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांनी कॅन्सर व आयोडीनयुक्त मीठ याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर मालगुंड ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये यांनी बालकांचा विकास व आहार आणि त्यांच्यावर केले जाणारे संस्कार याबाबत सखोल असे बहुमोल मार्गदर्शन केले. पोषण पंधरवडा निमित्ताने महिलांनी पौष्टिक व सकस विविध पाककला पदार्थांचे प्रदर्शन केले होते. यामधून एक ते चार नंबर काढण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक कस्तुरी केळकर द्वितीय क्रमांक धनश्री धावडे, तृतीय क्रमांक हर्षदा खापणे उत्तेजनार्थ शमिका शेखर घवाळी या विजेत्यांना बक्षीसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमासाठी वरची निवेंडीच्या सरपंच रवीना कदम, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्कये, भगवतीनगरच्या सरपंच श्रेया राजवाडकर,मालगुंडच्या उपसरपंच स्मिता दुर्गवळी, मालगुंड रहा राहटागर पोलीस पाटील निधी मांडवकर आशा सेविका साधना पवार, सुजाता मांडवकर, सौ. मेन्ये तसेच बचत गट महिला व त्यांच्या सीआरपी तसेच बीट मालगुंड- एकच्या बीट प्रमुख धनश्री धनंजय बाचिम व सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व अंगणवाडीसेविका व सुपरवायझर भागवत मॅडम यांचे उत्तम सहकार्य लाभले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका ज्योती पवार यांनी तर आभारप्रदर्शन अंगणवाडीसेविका सेविका दीपाली केळकर यांनी केले.



