सामाजिक

वार्षिक राशीभविष्य २०२६

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये (DASC/JVV)

नमस्कार!

सर्व हिंदुस्थान वासियांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!

हे नूतन वर्ष आपणांस सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि दीर्घायुरारोग्याचे जावो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी विनम्र प्रार्थना!!

सध्या गुरु महाराज मिथुन राशीत विराजमान असून १ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ते शीघ्र गतीने सिंह राशीत प्रवेश करणार असून पुन्हा २४ जानेवारी २०२७ रोजी वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. यावर्षी शनिदेव मीन राशीतून मार्गक्रमण करीत असून संपूर्ण वर्षभर मीन राशीतच रहाणार आहेत. राहू आणि केतु हे सध्या अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत विराजमान असून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी तेसुद्धा वक्री चालीने अनुक्रमे मकर व कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षल संपूर्ण वर्षभर वृषभ राशीत, नेपच्यून संपूर्ण वर्षभर मीन राशीत आणि प्लुटो संपूर्ण वर्षभर मकर राशीत विराजमान असणार आहे.

पुरातन काळापासून १२ राशींप्रमाणे भविष्याचा विचार करण्यासाठी रविपासून शनिपर्यंत सातच ग्रहांचा विचार केला जात होता. राहू-केतूंचा शोध लागल्यानंतर त्यांचाही विचार राशीभविष्याच्या दृष्टीने करण्यास सुरुवात झाली. परंतु या कलियुगाच्या २१ व्या शतकात हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे तीन ग्रह मानवी जीवनावर विशेषत्वाने जास्त प्रभावशाली होतांना दिसत आहेत. त्यामुळे मी माझ्या वार्षिक राशिभविष्य लेखनामध्ये त्या ग्रहांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा विचार करूनच गेले काही वर्ष लेखन करीत आहे. तर आता वळूया मेष ते कर्क या चार राशींच्या सन २०२६ च्या वार्षिक राशीभविष्याकडे!

मेष –

मुळातच आपण आपल्या अंगी असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जा आणि शक्तीच्या माध्यमातून जनमानसावर एक वेगळी छाप पाडत असता. कोणत्याही क्षेत्रात धडाडीने पुढे जाऊन हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यास आपण सदैव तत्पर असता. २९ मार्च २०२५ पासून आपल्या राशीला शनी साडेसातीची सुरुवात झालेली असून आपण साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात असणार आहेत. मात्र गुरुमहाराज आपल्या राशीला थोडा थोडा काळ तिसरे, चौथे आणि पाचवे येणार आहेत. नवीन वर्षाचा सुरुवातीचा काळ हा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या काळात आपण घरातील ज्येष्ठ लोकांच्या सल्ल्याने निर्णय घेतल्यास हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक धनाचा वापर व्यवसायासाठी करणे हिताचे राहील. यावर्षी आपल्या भावंडांसाठी आपल्या मिळकतीतील काही हिस्सा खर्च करावा लागेल. काही वेळा वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. परंतु स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवाल. घर, जागा, वाहन यांसाठी गुंतवणूक करतांना थोडी काळजी घ्यावी लागेल. अशा कामांमध्ये अचानक काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु जून महिन्यानंतर अशा प्रकारची कामे मार्गी लागतील. आर्थिक उत्पन्नाचे नवीन पर्याय समोर चालून येतील. शैक्षणिक दृष्ट्या विचार करता हे वर्ष अत्यंत उत्तम आणि यश देणारे राहणार आहे. शिक्षणाच्या नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याचे योग यावर्षी येतील. काही कारणांमुळे अचानक शैक्षणिक दिशा बदलण्याचा संभव आहे. जून महिन्यापर्यंत आपण राबवत असलेल्या प्रकल्पांसाठी कोणत्याही प्रकारे नवीन कर्ज घेण्याच्या फंदात पडू नये. आपल्या मातुल घराण्याकडून काही दुःखद वार्ता कानावर येऊ शकेल. तरुण-तरुणींनी कोणाशीही जवळीक किंवा मैत्री करतांना पूर्ण विचार करणे हिताचे राहील, अन्यथा तोंडघशी पडावे लागेल. आपण कोणाच्या प्रेमात पडलेला असाल तर मर्यादांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही काम जोशपूर्ण करत असलात तरी होश ठेवून करणे आवश्यक आहे. विशेषतः वाहन चालवतांना काळजी घेणे महत्त्वाचे राहील. अग्नी आणि पाण्याशी खेळ करणे टाळावे. आपण जर योग्य मार्गाने चालत असाल तर आपल्याला भाग्याची साथ अतिशय उत्तम मिळेल. कुटुंबासोबत तीर्थक्षेत्री जाण्याचे योग येतील.

या राशीच्या काही लोकांना यावर्षी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेश प्रवास घडणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आर्थिक आवक चांगली राहील. जुनी प्रलंबित येणी वसूल होतील. मे महिन्यानंतर कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास शेअर मार्केटमध्ये गुंवतणूक लाभदायक ठरेल. त्याचप्रमाणे नवीन कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. यावर्षी विनाकारण दुसऱ्यांच्या भानगडीत पडू नये. गरज नसतांना पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात जाण्याची वेळ स्वतःवर ओढवून घेऊ नका. आपल्या राशीच्या स्वभावानुसार जर वागलात तर तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते. एकंदरीतच या संपूर्ण वर्षभरात शांत राहून नीतिमत्तेने वागल्यास शुभफले निश्चितच मिळतील.

वृषभ –

“आ बैल मुझे मार!” थोडीशी अशी मनोवृत्ती असणारे लोक वृषभ राशीचे असतात. यावर्षी गुरु महाराज आपल्या राशीपासून दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानात भ्रमण करणार आहेत. संपूर्ण वर्षभर शनिमहाराज आपल्या राशीच्या लाभस्थानात राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी केलेल्या कामाचा लाभ मिळायला उशीर होताना दिसून येईल. मात्र असे असले तरी निर्णय घेताना सावधानता बाळगा. क्वचित प्रसंगी निर्णय चुकण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून कुटुंबामध्ये काही कलह किंवा कुरबुरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी आर्थिक भार उचलताना ओढाताण होईल. ऑक्टोबरपासून वर्ष अखेरीपर्यंत संतती बाबतीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. मे महिन्यापर्यंत घर, वाहन, शेतीवाडी, जमीनजुमला यासंबंधी कोणतेही व्यवहार करणे टाळावे, अन्यथा आर्थिक नुकसान आणि कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तुंम्ही मुलांच्या उच्च शिक्षणाविषयी चिंता करत असाल, तर चिंता मिटतील आणि मुलांकडून अपेक्षित प्रगती पहावयास मिळेल. नोकरदार वर्गासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ अत्यंत अनुकूल राहील. बढतीचे, तसेच अपेक्षित ठिकाणी बदली होण्याचे योग संभवतात. काहींना कार्यालयीन कामानिमित्त घरापासून दूर किंवा परदेशी जाण्याचे योग येतील. तुमच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा वाढतील. परंतु स्वतःच्या चुकीमुळे जोडीदाराचा विश्वास तुटणार नाही याची काळजी घ्या. ज्या लोकांचे विवाह व्हायचे आहेत, त्यांना विवाह होण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ राहील. विवाहेच्छुक लोकांचे विवाह ठरतील आणि होतील. आरोग्याच्या दृष्टीनेही थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः मधुमेहासारखे विकार असणाऱ्या जातकांनी आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वर्षाच्या अखेरीला कुटुंबासमवेत निसर्गरम्य ठिकाणी फिरावयास जाण्याचे किंवा देवदर्शनाला जाण्याचे योग येतील. शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांनी वर्षाच्या सुरुवातीपासून आपले काम योग्य वेळेत पूर्ण करावे, अन्यथा वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. त्यामुळे कामात आळस किंवा दिरंगाई करू नका. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी केलेली गुंतवणूक योग्य ठिकाणी करतो आहोत याची काळजी घ्या. धार्मिक किंवा अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी वर्षाच्या सुरुवातीचा आणि शेवटचा कालावधी अनुकूल राहील. विशेषतः धार्मिक आणि अध्यात्मिक लेखन करणाऱ्या लेखकांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. लाभांचा विनियोग करताना कंजूषपणा करणे अंगलट येईल. काही वेळेला उशीर झाल्यामुळे थोडीशी आर्थिक चणचण जाणवू शकते, परंतु उशीर झाला तरी लाभ निश्चित होतील याची खातरी बाळगा. आपलं काम करुन घेण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब करु नका. काही लोकांना यावर्षी अचानक आणि अनपेक्षित धनलाभ होतील. एकंदरीतच हे वर्ष आपल्यासाठी योग्य मार्गावरून गेल्यास अनुकूल राहील यात शंका नाही.

मिथुन –

मिथुन राशीच्या लोकांना यावर्षीचे गुरुभ्रमण राशीतून आणि राशीच्या कुटुंबस्थानातून, तसेच पराक्रम स्थानातून होणार आहे. तसेच शनिमहाराज वर्षअखेरपर्यंत कर्मस्थानात असणार आहेत. मुळातच मिथुन ही बुद्धिवादी राशी असल्याने आपल्या ठायी कायमच बौद्धिक क्षमता भरपूर असते. याचाच फायदा हा यावर्षी आपणांस मिळवायचा असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. शिक्षण आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष अत्यंत लाभदायी आणि यशदायी राहील यात शंका नाही. परंतु वर्षाच्या सुरुवातीपासूनच याचे अनुभव पहावयास मिळतील. अगदी सुरुवातीपासून यावर्षीच्या नियोजनासाठी आखलेल्या योजना जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे कशा नेता येतील यासाठी प्रयत्नशील राहा. अनाठायी कोणतेही साहस करायला जाऊ नका, नाहीतर आर्थिक बाजू कमकुवत होईल. जमीन-जागा, वाहन, घर यासंबंधी बराच काळ अडकून राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. मातेच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थीवर्गासाठी यावर्षी शैक्षणिक प्रगती महत्वाची राहील. मात्र अचूक शैक्षणिक शाखेची निवड करावी लागेल. प्रेमात पडताना शिक्षण महत्त्वाचे आहे हे विसरु नका. शिक्षण घेत असलेल्या मुलांकडून शुभवार्ता कानी येतील. विवाहेच्छुक असणाऱ्यांचे विवाह जुळतील. उच्च शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर अडचणी कमी होऊन मार्ग मोकळे होतील. वाहन चालवतांना विशेष करून दुचाकी वाहन धारकांनी काळजी घेणे योग्य राहील. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनर्थ टळेल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. जून महिन्यानंतर जोडीदारासोबत विनाकारण वादविवाद होऊन दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा. याउलट काही वेळा जोडीदाराच्या सल्ल्याने वागल्यास अनेक अडचणींमधून बाहेर पडाल. विशेष करून आपल्या जोडीदाराबरोबर बोलतांना, वागतांना स्वतःवर संयम ठेवा. राजकारण, समाजकारण अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी संपूर्ण वर्षाचा कालावधी शुभ राहील. मात्र हितशत्रूंपासून सावध राहा. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या लोकांना गुरुभेटीचा आनंद म्हणजे काय याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. ज्योतिष किंवा तत्सम विद्याभ्यास करणाऱ्यांना विशेषतः अशा विषयात पी. एच. डी. साठी प्रयत्न करत आहेत अशांना उत्तम यश मिळेल. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष जास्त कष्टाचे राहून कामातील जबाबदाऱ्या वाढतील. अशा लोकांनी विशेषतः शासकीय कागदपत्रांवर सह्या करतांना काळजी घ्यावी. शेअर मार्केटमध्ये उत्तम लाभ मिळतील. त्या दृष्टीने गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ राहील. भविष्यात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीतून मोठे लाभ होतील. मे महिन्यानंतर खर्चात कपात होईल. परदेशी जाण्याचे योग येतील, तयारीला लागा. ज्योतिष किंवा तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानमरातब तसेच पुरस्कार मिळतील. एकंदरीतच हे वर्ष योग्य वाटचाल केल्यास सुखाचे राहील, हे निश्चित.

कर्क –

मुळातच आपल्या गोड, लाघवी आणि भोळ्या स्वभावामुळे जनमानसात आपली प्रतिमा ही कायमच इतरांपेक्षा वेगळी असते. परंतु चंचलपणा, धरसोड वृत्ती, विसराळूपणा अशा काही गोष्टीदेखील आपल्या स्वभावाचे पैलू ठरलेल्या आहेत. त्यामुळे जीवनात स्थिरता आणायची असेल तर  स्वतःची आध्यात्मिक बाजू उन्नत करण्यासारखा दुसरा पर्याय नाही आणि तसे योग या वर्षात आपणांसाठी येत आहेत. त्यांचा योग्य लाभ घेणे हे आपणांसाठी उचित ठरेल. या वर्षी गुरुमहाराजांचे भ्रमण हे आपल्या राशीच्या व्यय, लग्न आणि धनस्थानातून होत आहे, तर शनिमहाराज आपल्या भाग्यस्थानात आहेत. याउलट राहूचे भ्रमण २५ नोव्हेंबर म्हणजे वर्ष अखेरीला अष्टम स्थानातून सप्तम स्थानात आणि केतुचे भ्रमण कुटुंब स्थानातून लग्न स्थानात होणार आहे. शनिमहाराजांच्या कृपादृष्टीमुळे कुटुंबातील सदस्यांशी आपले संबंध आतापर्यंत दृढ राहिले आहेत. यापुढे मात्र आपल्या धरसोड वृत्तीमुळे ते बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या. क्वचित प्रसंगी कुटुंबातील कोणासाठी आर्थिक खर्च करण्याची वेळ आली, तर मागेपुढे पाहू नका. खर्च वाढतील आणि लाभ उशिरा होतील. जो घेतो, तोच देतो, या वृत्तीने विचार करून वाटचाल केल्यास पुढील काळात तुमचाच फायदा होईल, यात शंका नाही. या वर्षी कोणत्याही नवीन प्रकल्पांची सुरुवात न करणेच आपल्यासाठी योग्य राहील. या वर्षी राहत्या जागेत किंवा घरामध्ये दुरुस्ती करणे, घराची सजावट करणे किंवा जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करणे यांसारख्या गोष्टी केल्याने आर्थिक ताण येतील. अशा वेळी आधी खर्चाचे नियोजन करून नंतरच अशा गोष्टी करा. विशेष करून कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागलात तर त्यात तुमचाच फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे वर्ष शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय कष्टांचे राहणार आहे. काही लोकांना शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचेही योग येतील. अपेक्षित ठिकाणी पैसे खर्च न करता सहजगत्या प्रवेश मिळणे कठीण होईल.. वर्षाच्या सुरुवातीला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे राहील. विशेषतः पोटाचे विकार, मधुमेह, पचनाचे विकार अशा बाबतींमध्ये काळजी घेणे, योग्य प्रकारे पथ्यपाणी सांभाळून वागणे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे राहील. वारसाहक्काने किंवा सासुरवाडी कडून अचानक काही लाभही होण्याचे योग येतील. जोडीदाराबरोबर वादविवाद करणे टाळा. वैवाहिक जीवन सुकर राहण्यासाठी यावर्षी थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक न्यायालयात सुरु असणाऱ्या केसमध्ये लवकर यश मळणे शक्य आहे. त्यामुळे आपण थोडेसे मानसिक स्वस्थ व्हाल. वर्षाच्या अखेरीचा काळ हा उच्च शिक्षणामध्ये पूर्तता होण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल राहील. नोकरी व्यवसायात बढती आणि अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. धार्मिक, अध्यात्मिक ओढ वाढेल. गुरुदर्शन आणि गुरुप्राप्ती होईल आणि आपण सुखावून जाल.

धन्यवाद!!

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये, (DASC/JVV)

संस्थापक अध्यक्ष – “श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी. SO 9001-2015 मानांकन प्राप्त संस्था

संपर्क – ९४०५९५४७२९. 

(शंका निरसन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button