कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाकरिता होणार रुग्ण तपासणी
"एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवूया !"

रत्नागिरी दि. ९ :- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाकरिता होणार रुग्ण तपासणी कार्यक्रम आयोजित केला आहे.
असंसर्गजन्य आजारांची झपाटयाने वाढ होत असून जवळपास ६३% मृत्यु हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणा-या मृत्युंचे प्रमाण ९% आहे. Globocan २०२० च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या विचार करिता मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत. आजच्या काळातील बदलती जीवनशैली व सवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.
वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे दि. ०८/०४/२०२६ ते ११/०५/२०२६ पुढील १ महिना कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर कर्करोगाकरिता मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणी प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे. या वाहनामध्ये मुखाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग इत्यादींची तपासणी दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञांमार्फत मोफत करण्यात येणार आहे.
कॅन्सर व्हॅन फिरतीचा कार्यक्रम :
➤ दि. ०८ एप्रिल ते ११ एप्रिल संगमेश्वर,
➤ दि. १३ एप्रिल ते १६ एप्रिल चिपळूण,
➤ दि. १७ एप्रिल ते २० एप्रिल खेड,
➤ दि. २१ एप्रिल ते २२ एप्रिल मंडणगड,
➤ दि. २३ एप्रिल ते २५ एप्रिल दापोली,
➤ दि. २७ एप्रिल ते २९ एप्रिल गुहागर,
➤ दि. ३० एप्रिल ते ०४ मे रत्नागिरी,
➤ दि. ०५ मे ते ०७ मे लांजा,
➤ दि. ०८ मे ते ११ मे राजापूर,
जिल्हयातील सर्व ग्रामस्थांनी कॅन्सर व्हॅन मार्फत देण्यात येणा-या सेवासुविधांचा मोठ्या प्रमाणावर उपभोग घेऊन आपली तपासणी करुन घ्यावी. अधिक माहितीकरिता जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये भेट देऊन चौकशी करण्यात यावी.
कर्करोगविषयक आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर कॉल करून माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.



