रत्नागिरी

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथील गोपाळ कारकर गुरुजी यांचे निधन

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील आंबवली (कारकर वाडी) येथील गोपाळ गोविंद कारकर ( गुरुजी) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

शिक्षक म्हणून सेवेत असताना त्यांनी ज्या ज्या शाळेत कार्य केले, त्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक शिस्तबद्ध शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक आणि कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती .त्यांनी जिल्हा परिषद शाळा पूर्ये (संगमेश्वर), आंबव पोंक्षे, केंद्र शाळा कासे नं. १, शाळा दाभोळे कोल्हेवाडी, शाळा आंबवली नं. २ तसेच शाळा आंबव (कोंडकदमराव, देवरुख) येथे उल्लेखनीय कार्य केले.सेवेत असताना त्यांनी प्रत्येक गावात शिस्तप्रिय विद्यार्थी घडवले. त्यांचा लोकसंपर्क अत्यंत उत्तम होता व त्यांनी आयुष्यभर नाती जपली.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पंचक्रोशी ते देवरुख–संगमेश्वर परिसरात एस.टी.च्या काही थांब्यावर “एस.टी. थांबा” असे फलक स्वखर्चाने लावले.

वयाच्या ७० व्या वर्षी ठाणे येथील टिळक सर (वय ८२) यांच्याकडून त्यांनी ऐतिहासिक शिवकालीन मोडी लिपी शिकली. पुढे त्यांनी मोडी लिपीचे वर्ग सुरू करून अनेक विद्यार्थी घडवले.

समाजकार्याची त्यांची ओढही तितकीच मोठी होती— पायवाटा व रस्ते स्वच्छ केले. तर कधी हाती छडी घेऊन शिस्तीचे धडे दिले. नमन, भजन, शक्ती तुरा नाच अशा अनेक कोकणातील लोककला जपण्यासाठी त्यांचा मोलाचा हातभार होता. तसेच जुन्या अनिष्ट रूढींचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. एक उत्तम सल्लागार म्हणूनही त्यांची ओळख होती.

अशी निःस्वार्थ समाजसेवा करणारे, एकवचनी व शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button