
देवरूख दि. १६ (सुरेश सप्रे) :- रत्नागिरी जिल्ह्यातील जिप. पं. स. व नगरपालिका, नगर पंचायत निवडणूका लढण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. पक्षाचे जेष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक तालुक्यातून आढावा घेण्याच्या उद्देशान बैठका सुरू केल्या असुन वेळ पडल्यास आमची सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. जिल्हातील महायुतीचा निर्णय वरीष्ठ पातळीवरून घेतला जाईल असे बने यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला मोठा संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येक तालुक्यातून निवडणूकपूर्व आढावा घेतला जात असून या बैठकीतून पक्षाचे कार्यकर्ते निवडणुका लढण्यासाठी तयार असल्याचे बने यांनी सांगितले.
आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात महाआघाडीचा धर्म पाळत आहोत.महाआघाडीबाबतचा निर्णय वरीष्ठ पातळीवरून घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली असल्याचा दावा ही बने यांनी करत आम्ही या सर्व निवडणुका वेळ आली तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुक्यातून इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी अर्ज दाखल करणेस सुरुवात केली आहे. त्याची छाननी पक्षाच्या पार्लमेंटली बोर्डाच्या बैठकीत घेण्यात येईल असे ही स्पष्ट केले.



