महाराष्ट्र

भुदरगड- पडखंबे येथे वन्यजीव सप्ताह निमित्ताने वन्यजीव चित्र रंगभरण स्पर्धा संपन्न

भुदरगड दि. ८ : – वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वन्यजीव चित्र रंगभरण स्पर्धा व वन्यजीव जनजागृती प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वनविभाग भुदरगड व पर्यावरणमित्र अवधूत पाटील यांच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करुन त्याबाबत जनजागृती करणे, वन्यजीवांचे महत्व लोकांना पटवणे याकरिता 1952 पासून वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करतात. वन्यजीवांबद्दल खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हायचे असल्यास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी हा उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणून जिल्हा परिषदेच्या पडखंबे येथील शाळेत चित्र रंगभरण स्पर्धा, वन्यजीव विशेषता सर्पविषयक प्रबोधन, प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम घेत विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विद्या मंदिर पडखंबे, वरपेवाडी व न्हाव्याचीवाडी येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात जान्हवी पाटील हिने सादर केलेल्या झाडांच्या कवितेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मंदिर पडखंबे चे मुख्याध्यापक तानाजी धारपवार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना गारगोटी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांनी वन्यजीवांचे मानवी अन्नसाखळीतील महत्व विषद केले. पर्यावरणमित्र अवधूत पाटील यांनी सर्पविषयक समज गैरसमज ह्या विषयावर प्रबोधन केले. सदर कार्यक्रमात वनअधिकारी बळवंत शिंदे, वनरक्षक एस बी तांबेकर, संतोष गोजारे, वनिता कोळी, निकिता चाळक, विद्या मंदिर न्हाव्याची वाडीचे सुनिल निकम, अद्यापिका आसमा काझी मॅडम, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सूत्रसंचालन अद्यापक पांडुरंग गुरव यांनी व विद्या मंदिर वरपेवाडी मुख्याध्यापिका संपदा यादव यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button