रत्नागिरी

राजापूरचे माजी नगराध्यक्ष सुरेश उर्फ बाबूराव कोळेकर यांचे निधन

राजापूर दि. ५ :- काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पाईक व राजापूरचे माजी नगराध्यक्ष सुरेश परर्शुराम उर्फ बाबूराव कोळेकर (७५) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राजापूर शहरात वरचीपेठ येथील रहिवासी असलेले सुरेश कोळेकर हे बाबुराव या टोपण नावाने सगळयांना परिचित होते. काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. राजापूर नगर परिषदेत नगर सेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अडीज वर्षें नगराध्यक्षपदही भूषविले होते. त्या काळात त्यांनी शहराच्या सर्वांगिण विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला.

एक शांत, संयमी व मितभाषी, दिलखुलास आणि आजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जात. मे महिन्यातच त्यांनी वयाची ७५ पुर्ण केली होती. यावेळी कोळेकर परिवाराच्या वतीने त्यांचा हा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते शहर बाजारपेठेतुन आपल्या दुचाकीवरून फेरफटका मारून घरी गेले. घरी गेल्यावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांना ह्दविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाचे वृत कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कोळेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

त्यांच्या प्रश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी वरचीपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button