अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात छंदोत्सवाची दिमाखदार शोभा यात्रेने सुरुवात

रत्नागिरी दि. १९ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवाच्या रंगमंचीय कार्यक्रमांची सुरुवात दिमाखदार शोभायात्रेने करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी ढोल पथकात तर विद्यार्थिनी लेझीम पथकात सहभागी झाले होते.
नटराजाची मूर्ती असलेली पालखी सुशोभित करून मान्यवरांच्या उपस्थितीत खातू नाट्यमंदिर येथे आणण्यात आली. याप्रसंगी र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, आजीव मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. सुरेंद्र ठाकुरदेसाई, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. व्ही. टी. केळकर, छंदोत्सव प्रमुख मकरंद दामले, कला शाखा विभागप्रमुख वैभव कानिटकर, वाणिज्य शाखा विभागप्रमुख शिल्पा तारगावकर, विज्ञान शाखा विभागप्रमुख दिलीप शिंगाडे व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
छंदोत्सवाच्या रंगमंचीय अविष्कारांची आजपासून सुरुवात झाली. सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे प्रतीक असणारे पारंपरिक पेहराव परिधान केले होते. छंदोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध कला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यामध्ये शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, छायाचित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेमध्ये ‘माझा भारत माझा अभिमान’ हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. अतिशय व्यापक स्वरूपाच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या. छायाचित्र स्पर्धेसाठी ‘निसर्गातील आकृतीबंध’ आणि ‘रंग कोकणचे’ हे विषय देण्यात आले होते. फूड फेस्टचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी पाच स्टॉल उभारण्यात आले होते.



