
चिपळूण दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानानिमित्ताने व तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा वतीनेयेथे जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.
या स्पर्धेसाठी ग्रीनिज बुकमध्ये सायकलिंगबाबत नाव नोंद झालेल्या डॉ. मनीषा वाघमारे यांना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी चिपळूणचा नावलौकिक वाढविला आहे. तसेच चीफ एअर मार्शल हेमंत भागवत, खासदार नारायण राणे, आयर्न मान डॉ.तेजांदन गणपते यांच्या उपस्थित या स्पर्धेचा शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेची जोरदार तयारी चिपळूणमध्ये सुरू आहे. ही स्पर्धा पूर्णपणे मोफत आहे. सदर स्पर्धा दोन गटात होणार असून प्रथम गट हा वय वर्ष १४ ते १८ वर्ष असेल तर दुसरा गट हा वय वर्ष १८ पासून पुढे खुला असेल. ही नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धा दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वा. ते १०:३० वा. पर्यंत या वेळेत होणार आहे.
सदर नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे अंतर ३ कि. मी. आणि ५ कि. मी अशा दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. या स्पर्धेच्या शुभारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून सुरू होऊन परत तिथे संपणार आहे. नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल. ही स्पर्धा शालेय गटामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी या दोन विभागात होणार आहे. तर खुला गटात पुरुष आणि महिला या गटात होणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल .
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रदेश युवा सचिव विक्रम जैन, भाजप युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष मंदार खंडकर. युवा मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्ष महेश तटकरे, युवा मोर्चा सरचिटणीस मंदार कदम, संकेत चिले, शुभम पिसे, कुणाल अंबेकर यांनी केले आहे.



