लांजा वंजारे महाविद्यालयाचा कोकण झोनमधून विद्यापीठस्तरापर्यंत प्रवास
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत पदके व पारितोषिके पटकावली

लांजा दि. २५ : मुंबई विद्यापीठ आयोजित 58 व्या युवा महोत्सवात लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत कोकण झोनमधून थेट विद्यापीठस्तर गाठला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत पदके व पारितोषिके पटकावून लांजा शहराचे नाव उज्ज्वल केले.
कला शाखेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी सोहम प्रकाश मांडवकर याने स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेसाठी त्याला महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. स्वप्निल कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. फोटोग्राफीसारख्या तांत्रिक स्पर्धेत ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थ्याने अशी कामगिरी करणे ही विशेष बाब ठरली.
तर कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या आझमीना अल्लाउद्दीन नेवरेकर हिने मेहंदी डिझायनिंग स्पर्धेत कोकण झोनमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विद्यापीठस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. तिच्यासोबत या स्पर्धेत नदिरा अमजद वणू ही सहाय्यक म्हणून सहभागी होती.तसेच अकाउंट अँड फायनान्स शाखेची तन्वी ज्ञानेश्वर आगरे हिनेही रांगोळी स्पर्धेत विद्यापीठस्तरीय व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
या सर्व स्पर्धा मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथील सर चावूसजी जहांगीर कॉन्व्होकेशन हॉलमध्ये पार पडल्या. पारंपरिक आणि आधुनिक कलांचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धांतून कोकणातील विद्यार्थ्यांची प्रतिभा विद्यापीठस्तरावर पोहोचली.
या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उपकार्याध्यक्ष सुनील कुरूप, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, संचालक व सल्लागार मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनिल चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सचिन घोबले आणि सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



