रत्नागिरी

रत्नागिरीतील ऐतिहासिक ‘डीएसपी बंगला’ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

रत्नागिरी दि. २५ : शहरातील ऐतिहासिक ‘डीएसपी बंगला’ या वास्तूच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची ही ब्रिटिश कालीन वास्तू आहे. दरम्यान, या वास्तूची दुरवस्था पाहून सध्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ती दुरुस्त करण्याचे आणि या वास्तुला ‘हेरिटेज’चा दर्जा देण्याची मागणी केली होती.

रत्नागिरी शहर परिसरातील ही वास्तू ब्रिटिशांनी १८८५ मध्ये ब्रह्मदेशचा राजा थिबा याला नजरकैदेत ठेवण्यासाठी उभारलेल्या इमारतींपैकी एक मानली जाते. सुमारे २५ वर्षे थिबा राजा येथे वास्तव्यास होते असे सांगितले जाते. यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ही वास्तू जुन्या वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अनेक माजी पोलीस अधीक्षकांनी या बंगल्यात वास्तव्य केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून या बंगल्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. छप्पर ठिकठिकाणी मोडकळीस आले होते. त्यामुळे पावसाळ्यात गळती होत होती. बंगल्यातील फर्निचरही जुने आणि मोडकळीस आलेले होते, ज्यामुळे अधिकाऱ्यांना तिथे राहणे कठीण झाले होते. सध्याच्या पोलीस अधीक्षकांनी या दुरवस्थेमुळे येथे राहणे टाळले होते आणि दुरुस्तीची मागणी केली होती.

पोलीस अधीक्षकांच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आता या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून, ते लवकरच पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कामामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button