कृषीरत्नागिरी

वणौशी येथे शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणीबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

दापोली दि. १२ सप्टेंबर  (सागर गोवळे) :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ गटाच्या वतीने वणौशी तर्फ पंचनदी येथे शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी आणि वापराबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये फवारणीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबद्दल जनजागृती करणे हा होता. प्रात्यक्षिकादरम्यान कृषी कन्यांनी खालील मुद्द्यांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले:

योग्य निवड व डोस: कीड ओळखल्यानंतरच योग्य कीटकनाशकाची निवड करणे, लेबलवरील विषारीपणाच्या रंगांचे पट्टे व सूचना वाचून शिफारशीनुसारच रसायनांचा वापर करणे.

सुरक्षा साधनांचा वापर (PPE): फवारणी करताना हातमोजे, मास्क, गॉगल्स, पूर्ण बाह्यांचे कपडे, ॲप्रन आणि गमबूट वापरण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

फवारणीची योग्य वेळ व पद्धत: फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी, वाऱ्याचा वेग कमी असताना करावी. जोरदार वारा, पाऊस किंवा तीव्र उन्हात फवारणी टाळावी. तसेच फवारणीपूर्वी यंत्र, नोजल व गळती तपासण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

काळजी व स्वच्छता: फवारणीदरम्यान खाणे, पिणे किंवा धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करावे. फवारणीनंतर हात-चेहरा स्वच्छ धुवून स्नान करावे आणि उपकरणे स्वच्छ करावीत.

साठवणूक व सुरक्षितता: कीटकनाशके लहान मुले, अन्नधान्य व जनावरांपासून दूर ठेवावीत. रिकाम्या डब्यांचा अन्न किंवा पाणी साठवण्यासाठी पुनर्वापर करू नये.

या उपक्रमात कृषी स्नेही गटातील समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, श्रावणी मोरे, तन्वी नादिवडेकर, नीलम मदने, कोमल झिरवाळ, श्रुती बोबडे, अंकिता मुंज, सलोनी सावंत व साक्षी लोके या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या प्रात्यक्षिकाचा स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button