रत्नागिरी

आपलं गाव, आपली जबाबदारी’: दापोलीतील बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांचा ‘आत्मनिर्भर’ आदर्श; स्वखर्चाने केली रस्ता सफाई व झाडांची छाटणी

दापोली दि. ७ सप्टेंबर (सागर गोवळे) :-  शासकीय निधीची अथवा प्रशासकीय मंजुरीची वाट न पाहता लोकसहभागातून गावाचा विकास कसा साध्य करता येतो, याचा उत्तम वस्तुपाठ दापोली तालुक्यातील बोरिवली (आडीवाडी) येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून संपूर्ण गावाने एकत्र येत स्वखर्चाने व श्रमदानातून गावातील मुख्य रस्त्यांची सफाई आणि धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मोहीम फत्ते केली आहे.

वाहतूक व वीज पुरवठ्यातील अडथळे दूर

या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत बोरिवली आडीवाडी ते पंचनदी आणि बोरिवली आडीवाडी ते चिखलगाव या दोन्ही मुख्य मार्गांवर काम करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाढलेली झुडपे, एसटी बस तसेच इतर वाहनांच्या रहदारीस अडथळा ठरणारी झाडी पूर्णपणे हटवण्यात आली. याशिवाय, वीज वाहिन्यांवर (लाइटच्या तारांवर) लटकणाऱ्या आणि अपघातास आमंत्रण देणाऱ्या धोकादायक फांद्यांचीही छाटणी करण्यात आली.

१००% स्वयंपूर्णता आणि सातत्याची परंपरा

या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांची १००% स्वयंपूर्णता! कटर मशीन्स, आवश्यक अवजारे आणि यासाठी लागणाऱ्या इंधनाचा (पेट्रोल-डिझेल) संपूर्ण खर्च ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून केला आहे. विशेष म्हणजे, हे काम केवळ एका वर्षापुरते मर्यादित नसून, दरवर्षी न चुकता सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गावातील मूलभूत प्रश्न स्वतः सोडवतात.

केवळ प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवून बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांच्या या एकजुटीचे आणि ‘आत्मनिर्भर’ पॅटर्नचे दापोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button