सोलगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास ‘भाई’ पाटील यांचे निधन
शिवसेनेचा खंदा, मितभाषी आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड

रायपाटण, दि. २४ ऑगस्ट (प्रतिनिधी) : सोलगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे माजी तालुकास्तरीय नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास तथा ‘भाई’ पाटील यांचे रविवारी सकाळी वयाच्या ६७व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलगावसह राजापूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सन २००२ मध्ये देवाचे गोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून येत सुहास पाटील यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. त्या काळात ते शिवसेनेचे तालुक्यातील प्रमुख आणि प्रभावी नेते म्हणून परिचित होते. सोलगावच्या विकासकामांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सोलगावचे सरपंचपदही त्यांनी भूषविले होते.
राजकारण करत असताना सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क, मितभाषी स्वभाव आणि कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. पदापेक्षा माणसांना महत्त्व देणारा कार्यकर्ता आणि समाजकारणाची जाण असलेला नेता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.
‘भाई’ पाटील यांच्या निधनाने एक खंदा, निष्ठावान आणि मितभाषी कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एका महत्त्वाच्या कार्यकर्त्याची उणीव निर्माण झाल्याची हळहळही व्यक्त करण्यात आली.
रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, भाऊ, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.



