रत्नागिरी

समाजकार्यातून आजही बाळासाहेब खेर जीवंत- माधव अंकलगे

मुंबईचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन साजरा

रत्नागिरी दि. २४ ऑगस्ट : राजकारणात कार्यरत राहिले तरी कोणतीही अपेक्षा न ठेवता मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी विराट कार्य करून ठेवले आहे. शेवटपर्यंत सामाजिक कार्य करत राहिले व रत्नागिरीसाठी यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाची स्थापना केली. आज ७८ वर्षांनीही त्यांचे कार्य जीवंत आहे, असे प्रतिपादन कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.

कै. बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात आयोजित कृतज्ञता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजशेखर मलुष्टे, यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, विद्यमान अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रा. बिना कळंबटे यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, ट्रस्टी बाळकृष्ण शेलार, कार्यवाहक नरेंद्र खानविलकर आदींसह हितचिंतक, आजी- माजी छात्रमित्र उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात ॲड. मलुष्टे यांनी पुढील ५ वर्षांचा आराखडा बनवूया. येथून विद्यार्थी न्याय व्यवस्था, प्रशासन, अभियंता, वैद्यकीय क्षेत्र अशा नामवंत क्षेत्रांमध्ये अव्वल स्थान पटकावतील यासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असे सांगितले. सर्वोदय कट्टा उपक्रम चालू करून तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करूया, असे सुचवले.

या कार्यक्रमात संस्थेचे हितचिंतक विजयानंद जोशी यांनी देणगीचा धनादेश ॲड. संदीप ढवळ यांच्याकडे सुपूर्द केला.

या वेळी ॲड. संदीप ढवळ यांनी बाळासाहेब खेर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वोदय छात्रालयाचा तेजस्वी इतिहास सांगितला. चारित्र्यसंपन्न युवक घडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. हरिश्चंद्र गीते यांनीदेखील छात्रालयाचे काम माजी विद्यार्थी चांगल्या रितीने करत असल्याचे सांगितले. गजानन चाळके यांनी आभार मानले.

विद्यार्थी गौरव

याप्रसंगी श्रीमान बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार सर्वोदय छात्रालयातील विद्यार्थी अथर्व दत्ताराम पांचाळ याला प्रदान करण्यात आला. तसेच तात्या ताई शिष्यवृत्ती वितरण, कै. पद्मजा व कै. विष्णू बर्वे शिष्यवृत्ती, कै. राजाराम पांगम शिष्यवृत्ती, कै. हेमलता गीते शिष्यवृत्ती आणि कै. शैलजा भाटकर शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ अण्णा लिमये यांचा विशेष सत्कार हरिश्चंद्र गीते यांनी शाल, सन्मानचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button