
वनौशी दि. २८ ऑगस्ट (सागर गोवळे) :- ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषिस्नेही व कृषिसखी गटाच्या वतीने वनौशी येथे शेतकऱ्यांसाठी ‘कोकण जलकुंड’ निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा शेतीसाठी योग्य वापर कसा करावा, याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांनी ४ मीटर × १ मीटर × १ मीटर आकाराचे कोकण जलकुंड प्रत्यक्ष तयार करून दाखवले. या जलकुंडाची पाणी साठवण क्षमता अंदाजे ४ घनमीटर म्हणजेच तब्बल ४,००० लिटर आहे. उन्हाळ्यात किंवा पाणीटंचाईच्या काळात एका आंब्याच्या झाडाला एका सिंचनावेळी २० लिटर पाणी दिले, तर या साठवलेल्या पाण्यातून सुमारे २०० झाडांना पूरक सिंचन देणे सहज शक्य होते, हे गणित विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच जलकुंडासाठी योग्य जागेची निवड, निर्मितीची पद्धत, योग्य आकारमान, पाणी साठवण आणि देखभाल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर उपक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. सचिन पाठक व डॉ. श्वेतांबरी नगरकर तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिस्नेही व कृषिसखी गटाच्या सदस्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. या प्रात्यक्षिकाचा स्थानिक शेतकऱ्यांना आंबा बागेच्या व्यवस्थापनासाठी मोठा फायदा होणार आहे.



