रत्नागिरी

कशेळीच्या सुपुत्रांचा राष्ट्रीय गौरव; पं. शैलेश भागवत यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

राजापूर दि. १८ ऑगस्ट :-  शहनाई (सनई) वादनाच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ अखंड संगीतसाधना करून राष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राजापूर तालुक्यातील कशेळी गावचे सुपुत्र पं. शैलेश भागवत यांना संगीत नाटक अकादेमीचा शास्त्रीय संगीतात शहनाई वादन या माध्यमातून केलेले योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त झालाआहे.दिल्ली येथील विज्ञान भवनात १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पं. भागवत यांचा सन्मान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानामुळे राजापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतात शहनाईला स्वतंत्र आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणाऱ्या कलाकारांमध्ये पं. शैलेश भागवत यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे मानाचे शिष्य म्हणून त्यांची ओळख आहे. गुरूंकडून लाभलेला सांगितिक वारसा, शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास, सुरेलपणा आणि सादरीकरणातील वैशिष्ट्यपूर्ण शैली यांच्या बळावर त्यांनी शहनाई वादनाला राष्ट्रीय स्तरावर नवी उंची प्राप्त करून दिली.

२ जून १९५८ रोजी ठाणे येथे जन्मलेल्या पं. शैलेश भागवत यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात पवित्र कोपिनेश्वर मंदिराच्या सान्निध्यात झाली. पंडित औरंगाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर प्रख्यात सतारवादक पं. मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या संगीतसाधनेला व्यापक दिशा मिळाली. पुढे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या मार्गदर्शनातून शहनाई वादनातील त्यांची साधना अधिक प्रगल्भ झाली.

संगीतसंस्कारांचा ठसा पं. भागवत यांच्या वादनावर स्पष्टपणे जाणवतो. मानवी आवाजातील सूक्ष्म चढ-उतार आणि भावभावना व्यक्त करणाऱ्या ‘गायकी अंग’ शैलीचा प्रभाव त्यांच्या शहनाईवादनात दिसून येतो. भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि स्वरांचे बारकावे यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या वादनात आढळतो.

शास्त्रीय संगीतापुरतेच त्यांचे योगदान मर्यादित राहिले नाही. नाट्यसंगीत, अभंग, भजन, गझल आणि शास्त्रीय चित्रपटसंगीत अशा विविध संगीतप्रकारांतही त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे.

पं. भागवत हे केवळ मैफली करणारे कलाकार नाहीत, तर शहनाई या वाद्याची परंपरा, ध्वनीनिर्मिती आणि शास्त्रीय बाजू यांचा अभ्यास करणारे जाणकार कलाकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. देशभरातील प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांनी मैफली सादर केल्या असून व्याख्यान-प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शहनाईच्या कलेची ओळख रसिकांपर्यंत पोहोचविली.

शहनाईसारख्या वायुवाद्याच्या ध्वनीनिर्मितीमागील शास्त्रीय बाजूचा अभ्यास करण्यासाठी त्यांना भारत सरकारची फेलोशिपही प्राप्त झाली. या विषयावरील त्यांचे संशोधन दिल्ली येथील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभिलेखागारात जतन करण्यात आले आहे. २००४ पासून ते भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)च्या मान्यवर कलाकारांच्या पॅनेलवर कार्यरत आहेत.

पुरस्काराचे श्रेय आई-वडील आणि गुरूंना

पं. शैलेश भगवत यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे कशेळी तसेच संपूर्ण राजापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या संगीतसाधनेची दखल देशातील सर्वोच्च सांस्कृतिक संस्थांपैकी एक असलेल्या संगीत नाटक अकादमीने घेतल्याने राजापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राचाही गौरव झाला आहे.

पुरस्काराबाबत पं. शैलेश भागवत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या या सन्मानाचे श्रेय आई-वडील आणि गुरू भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना दिले. गुरूंकडून मिळालेला सांगीतिक वारसा जपत शहनाईची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हेच आपल्या संगीतसाधनेचे सार असल्याचे त्यांनी नमूद केले.

साधी राहणी, संगीतावरील अढळ निष्ठा आणि सहा दशकांहून अधिक काळाची अखंड साधना यामुळे पं. शैलेश भागवत हे शहनाई वादनाच्या क्षेत्रातील मानाचे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button