रत्नागिरी

पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यास ३० खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय मंजूर

रत्नागिरी, दि. ९ जुलै : रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, ३० खाटांच्या एकात्मिक आयुष रुग्णालयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी रु. १०.५० कोटी (१०५० लाख) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या मंजुरीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मंजूर होऊ शकला, अशी भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार रत्नागिरीसह धुळे, सातारा, वाशीम आणि नांदेड या जिल्ह्यांतील आयुष रुग्णालयांसाठी एकूण रु. ६६ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या एकात्मिक आयुष रुग्णालयाच्या बांधकामासाठी रु. १०.५० कोटींची मंजुरी मिळाली आहे.

या रुग्णालयासाठी रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाजवळ, उद्यमनगर येथे आवश्यक जागा उपलब्ध असून, या ठिकाणी अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणामुळे जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे आयुष आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या नवीन रुग्णालयामुळे नागरिकांना आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी आदी आयुष उपचारपद्धतींचा दर्जेदार व सर्वसमावेशक लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आधुनिक सुविधा, आवश्यक वैद्यकीय पायाभूत व्यवस्था आणि रुग्णाभिमुख सेवा यामुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.

या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, आरोग्य क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध स्तरांवरून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

– डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button