रत्नागिरी

गणपतीपुळे त्या पाच जणांसाठी शोधकार्य सुरू; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

रत्नागिरी दि. २० :– गणपतीपुळे येथील समुद्रात ५ पर्यटक बुडाल्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. हे पाचही जण सध्या बेपत्ता असून प्रशासन आणि जीवरक्षकांकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी सर्वजण समुद्राचा आनंद घेण्यासाठी गेले असता, अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण बुडू लागले.

स्थानिकांचे आणि जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न

पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि कर्तव्यावर असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने धाव घेत त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, सध्या समुद्रात पाण्याचा करंट (प्रवाह) अत्यंत वेगवान असल्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

बेपत्ता असलेल्या ५ पर्यटकांची नावे

समुद्रात वाहून गेलेल्या आणि सध्या बेपत्ता असलेल्या ५ तरुणांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) आदित्य संतोष राऊत (वय २२)

२) अनिकेत बंडू हिवराळे (वय २०)

३) आनंद राजू नरवडे (वय २०)

४) प्रेम दीपक आदमाने (वय १९)

५) यश रामेश्वर कांबळे (वय १९)

(सर्व राहणार: बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button