रत्नागिरी

ठाकरे युवासेनेची उद्या सडेतोड वक्तृत्व स्पर्धा

प्रथम क्रमांकाला रोख रक्कम दहा हजारचे बक्षीस; जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचे विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी दि. ६ : स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवा यांचा संदेश देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहेत. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले असून या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच गौरवशाली पर्वाचे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण वक्त्यांना आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एका भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. युवासेना – शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत आहे.

युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आणि अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वात युवासेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने या भव्य “सडेतोड वक्तृत्व स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले असून “युवकांचे विचार… महाराष्ट्र घडवणार!” हा या स्पर्धेचा मुख्य गाभा आहे.

येत्या रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या रत्नागिरी शहरातील संपर्क कार्यालय येथे सकाळी 11 वाजता या स्पर्धेला सुरवात होणार आहे. तरुणाईच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेत ‘व्हिजन महाराष्ट्र २०५०’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका’ हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले सडेतोड विचार मांडण्यासाठी एकूण 4 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. विशेष म्हणजे वक्तृत्व क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे प्रवेश शुल्क पूर्णपणे निशुल्क म्हणजेच विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 10,000 रुपये रोख, द्वितीय क्रमांकाला 7,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये रोख अशा आकर्षक बक्षिसांसह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे, सोबतच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक वक्त्याला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक आणि वक्तृत्व क्षेत्रात आवड असणाऱ्या सर्व इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन आपल्या वाणीची आणि विचारांची ताकद सिद्ध करावी, असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केले आहे. स्पर्धेतील नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7378707909 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button