देवरुख-रत्नागिरी मार्गावर निवे बु मध्ये भीषण अपघात; उभ्या डंपरला वॅगनआरची धडक
एका नमन कलाकाराचा मृत्यू तर ४जण जखमी

देवरुख दि. १ :- देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (क्र. MH 08 G 1559) एका पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने (क्र. MH 02 JP 9493) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ‘ महादेव सांबरे रुग्णवाहिका’ सेवेचे चालक मनोज पांचाळ तसेच १०८ रुग्णवाहिका यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण नमन कलाकार होते. सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून ते निवळीच्या दिशेने कारने (MH 02 JP 9493) निघले होते. सकाळी ६ च्या सुमारास निवे बुद्रुक येथे आले असता, त्यांची कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर (MH 08 G 1559) पाठीमागून जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर मनोज पांचाळ आणि संतोष सांडिम यांनी डंपरखाली आणि कारमध्ये अडकलेल्या अपघाताग्रस्तांना अत्यंत शिताफीने बाहेर काढले.
या अपघातात एका नमन कलाकाराचा मृत्यू झाल्याचे समजते आहे, मात्र अद्याप त्याचे नाव समजू शकलेले नाही. इतर पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


