रत्नागिरी

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १५ जून लागू होणार; अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल होणार!

मुंबई दि. २९ :- पावसाळी हंगाम लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली आहे. या काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव कोकण रेल्वे मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार असून, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांमध्ये बदल

यामध्ये मुंबई–गोवा आणि कोकण मार्गावरील प्रवाशांची पसंती असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस , मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस यांचाही समावेश आहे. या गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतो.

रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, झाडे पडणे तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन दरवर्षी मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. कोकण रेल्वेचा मार्ग डोंगराळ भाग, घाट विभाग आणि बोगद्यांमधून जात असल्याने खबरदारी म्हणून गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवला जातो.

कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मूळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांनाच हे मान्सून वेळापत्रक लागू राहील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे सुधारित वेळापत्रक तपासूनच नियोजन करावे.

विशेष म्हणजे कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विविध गाड्यांच्या सुधारित वेळांची माहिती स्वतंत्र परिशिष्टात देण्यात येणार आहे.

स्थानकांवरील सूचना फलक, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली तसेच प्रसारमाध्यमांद्वारे ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. दरम्यान, मुंबई–गोवा प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या प्रमुख गाड्यांच्या वेळेत होणारे बदल लक्षात घेता, प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील पश्चिम किनारपट्टीवर पायाभूत सुविधांच्या सुधारणेचं काम सुरू झालं आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. शिवाय, मुंबईतील सीएसएमटी आणि एलटीटी रेल्वे स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्यांचे थांबेही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गाड्या ३ – ४ तास विलंबाने धावत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button