रत्नागिरी जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ; तीन महिन्यांत ६०३ जणांना सर्पदंश

रत्नागिरी दि. २९ :- जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६०३ व्यक्तींना सर्पदंश झाला आहे. सहसा पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक असते, मात्र यंदा थंडी आणि उन्हाळ्यातही दंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
जानेवारी ते एप्रिल या दरम्यान ही आकडेवारी समोर आली असून, याच काळात ४०० हून अधिक जणांना विंचूदंश देखील झाला आहे. याशिवाय माकड, मांजर, कुत्रा यांसारख्या इतर प्राण्यांनी हजारो जणांना चावा घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
रत्नागिरीत यंदा मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी थंड वातावरण असते, त्या ठिकाणी साप आश्रयाला येत आहेत. शेतकरी शेतात काम करत असताना, घरात किंवा परिसरात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात ५७७ व्यक्तींना सर्पदंश झाला होता, मात्र यंदा अवघ्या तीन-चार महिन्यांतच हा आकडा ६०३ वर पोहोचला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे.


