
रत्नागिरी दि. २८ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज (२८ मे) उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी काळातील संघटनात्मक कार्य, सामाजिक उपक्रम आणि पक्षाच्या बळकटीकरणासाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर SIR मतदार यादीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे बूथ लेव्हल एजंट (बीएलए) तातडीने नेमण्याचे ठरले. हे बीएलए मतदारयादीत नवीन नावे नोंदवणे आणि चुका सुधारण्याचे काम गतीने करतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम राबवणार आहे. यामध्ये रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार १३ जून रोजी देवरुख येथील मराठा भवन येथे करण्यात येणार आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम यांना वाहन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कस्टम ब्रोकर (निर्यात) हा नामांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सर्व कार्यकर्त्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. तसेच बाळासाहेबांचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्यास सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता कदम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम, उप जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, महिला उपाजिल्हा संघटक सायली पवार यांच्यासह सर्व उपतालुका प्रमुख, उपशहर प्रमुख, युवासेना कार्यकारिणी मधील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


