महाराष्ट्ररत्नागिरीराष्ट्रीय

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार!; आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी

नवी दिल्ली दि. २७ : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.

यावेळी आंबा शेतीच्या विमा योजनांमध्ये विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. या अटींमध्ये आवश्यक बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा केंद्र सरकार कडून मिळावा, अशी भूमिका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मांडली. यावेळी कोकणातील आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांना देण्यात आली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button