राजापूर – ताम्हाणे बनाचामाळ येथील वळणावर दुचाकी घसरून भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर दि. २७ :- तालुक्यातील ताम्हाणे ते पाचल दरम्यान प्रवासादरम्यान दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या एका भीषण अपघातात २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, २५ मे रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास ताम्हाणे बनाचामाळ येथील वळणावर घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश शिवाजी भोस्तेकर (वय २९ वर्ष, सध्या रा. सांताक्रुझ ईस्ट, मुंबई; मूळ रा. माणगाव, रायगड) हा तरुण त्याच्या ताब्यातील सुझुकी मोटरसायकलने (गाडी क्र. एम.एच. ०२ जी.एम ४७१३) ताम्हाणे ते पाचल असा प्रवास करत होता. ताम्हाणे बनाचामाळ येथील धोकादायक वळणावर आला असता, वेग जास्त असल्याने किंवा अन्य कारणाने त्याचा गाडीवरील ताबा सुटला.
ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात सिद्धेश याच्या शरीराला व डोक्याला लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात तो स्वतःच्याच मरणास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल या प्रकरणी फिर्यादी सुभाष शांताराम झांज (वय ४५ वर्षे, रा. ताम्हाणे, गावंधरवाडी, राजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मयत चालक सिद्धेश भोस्तेकर (आरोपी) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राजापूर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.


