नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेने चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा राखली कायम
७५ वर्षांहून अधिक वयाच्या लिंगायत सरांच्या निःस्वार्थ सेवेला यशाची पावती

नाटे दि. १६ :- नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेच्या सन २०२४–२०२६ या शैक्षणिक वर्षातील चित्रकला परीक्षेचा निकाल अत्यंत उज्वल लागला असून प्रशालेने सलग सहाव्या वर्षी शेकडा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे केवळ त्यांच्या मेहनतीचाच नव्हे, तर कलाशिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षक श्री. रवींद्र लिंगायत सर यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा मोठा वाटा असल्याचे सर्व स्तरांतून गौरवाने सांगितले जात आहे.
७५ वर्षांहून अधिक वय असतानाही लिंगायत सर आजही तरुण शिक्षकांइतक्याच तळमळीने आणि उत्साहाने विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता, केवळ कलेवरील प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीपोटी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. नियमित सराव, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वैयक्तिक लक्ष, कल्पकतेला वाव देणारी अध्यापन पद्धत आणि संयमित समजावून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चित्रकला विषयाच्या एलिमेंटरी परीक्षेस एकूण २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत, ९ विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत तर १ विद्यार्थ्याने क श्रेणीत उत्तीर्ण होत यश मिळवले आहे. तसेच इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेस १३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर ७ विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत यश संपादन केले आहे.
या निकालामुळे नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेचे नाव परिसरात उज्ज्वल झाले असून, लिंगायत सर यांची निःस्वार्थ सेवा ही आजच्या काळात दुर्मीळ असल्याची भावना पालकवर्ग, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनीही लिंगायत सर यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्यासह पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या आहेत.


