रत्नागिरी

आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; कोल्हापूरचे रिक्षाचालक गंभीर जखमी

साखरपा दि. २२ : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात आज पहाटेच्या सुमारास रिक्षाचा भीषण अपघात झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ झालेल्या या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH 09 EL 2608) घेऊन कोल्हापूरहून गणपतीपुळे येथे जात होते. रिक्षामध्ये गणपतीपुळे येथील दुकानदारांना देण्यासाठी पेढ्यांचे बॉक्स भरलेले होते. आज पहाटे ४ ते ५ च्या सुमारास त्यांची रिक्षा आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आली असता हा भीषण अपघात घडला.

हा अपघात नेमका कसा झाला याची अचूक माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, रिक्षाच्या झालेल्या दुरवस्थेवरून एखाद्या अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचालक साळोखे हे उलटलेल्या रिक्षाखाली दाबले गेले होते.

पोलिसांची तत्परता आणि मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने रिक्षाखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र, साळोखे यांच्या अंगावर गंभीर जखमा असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील जादा उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. साखरपा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button