रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी विशेष पॅकेजची गरज – जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके

रत्नागिरी दि. १४ :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. येत्या पावसाळ्यात एसटीची सेवा खंडित होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम समितीने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी शासनाकडून स्वतंत्र आर्थिक पॅकेज मिळावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विलास चाळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दालनात बांधकाम समितीची पहिलीच बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते या बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांच्या सद्यःस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ५०० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे असून, त्यामध्ये एक हजार किलोमीटरच्या इतर जिल्हामार्गांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी बसच्या अनेक फेऱ्या बंद कराव्या लागल्या होत्या, ज्याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला होता. ही परिस्थिती यंदा उद्भवू नये यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
रस्त्यांच्या या मोठ्या कामासाठी भरघोस निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन जिल्ह्यासाठी विशेष पॅकेजची मागणी केली जाणार आहे. यामध्ये प्रमुख जिल्हामार्गांच्या दुरूस्तीचाही समावेश असेल. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांची पहिल्या टप्प्यात दुरूस्ती केली जाणार आहे.


