विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना; भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार : मराठी भाषा मंत्री उदय सामंत

मुंबई दि. १८ :- मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना सन 2025 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना 2025 चा साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात ही घोषणा केली.
पुरस्काराचे स्वरूप
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि साहित्यभूषण पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप 10 लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हे पुरस्कार दिले जातात.
नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन
नाशिक येथे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत चार दिवसांचे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात वरील प्रमुख पुरस्कारांसह सन 2024 मधील 35 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत
प्रौढ वाङ्मय प्रकारातील 22 पुरस्कारांना प्रत्येकी 1 लाख रुपये
बाल वाङ्मय प्रकारातील 6 पुरस्कारांना प्रत्येकी 50 हजार रुपये
प्रथम प्रकाशनासाठी 6 पुरस्कारांना प्रत्येकी 50 हजार रुपये
सरफरोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र एका पुरस्कारासाठी 1 लाख रुपये
असे पुरस्कार दिले जाणार असून, एकूण 35 पुरस्कारांसाठी सुमारे 29 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांनी नमूद केले.



