रत्नागिरी

साडवलीचा सुपुत्र वरद नलावडेची प्रशासकीय सेवेत निवड

देवरूख दि. ७ (सुरेश सप्रे) :- साडवली गावातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व कै. विनायक ( तात्या ) नलावडे यांची सर्वच मुलं ही प्रतिभासंपन्न, साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली आणि त्याचबरोबर आपली ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम करण्याची तयारी यामुळेच प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात यशाला गवसणी घातलेली. वरदने सुद्धा आपल्या घराण्याची ही परंपरा जोपासताना मिळवलेले यश हे म्हणूनच विशेष उल्लेखनीय आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाची धुरा सांभाळणारे मित्रवर्य बळवंत (बापु) विनायक नलावडे आणि सौ.अनुजा यांचा सुपुत्र वरद याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ओपन कॅटेगरीतून असिस्टंट टॅक्स ऑफिसर या पदावर झालेली निवड, हा क्षण नलावडे कुटुंबियांसाठी सर्वोच्च आनंदाचा आहेच तितकाच तमाम साडवलीवासियांसाठी सुद्धा अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे.

वरदच्या स्वप्नांना बळ देणारे आईवडील व मार्गदर्शक यांनी घेतलेले परिश्रम यामुळेच वरदला दिशा मिळाली

लोकसेवा आयोगाच्या परिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरीखुरी अग्निपरिक्षा असते, यातून तावूनसुलाखून जे यशस्वी होतात तेच विद्यार्थी ( तरूण ) अधिकारी म्हणून मिरवतात पण त्यासाठी घेतलेले परिश्रम हे खूप महत्वाचे असतात, लोकसेवा आयोग किंवा प्रशासकीय सेवेतील मराठी तरुणांची संख्या पाहिली कि ही बाब प्रकर्षाने जाणवते. आपल्याकडील बहुतांश तरूण इंजिनिअर, डॉक्टर, फार्मसी, लॉ, एमबीए अशा रुळलेल्या वाटा चोखाळून आपले करिअर घडवतात पण वरदने मात्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा व प्रशासकीय सेवा हेच आपले करिअरचे ध्येय ठरवून आपले वेगळेपण सिद्ध केले.

कारण साडवलीतील ठाकरे विद्यालयात माध्यमिक शिक्षण व विज्ञान शाखेतून बारावी पुर्ण झाल्यानंतर साडवलीतील इंदिरा इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी मधून बी.फार्म. होवून एम. फार्म. सारखे सहज पर्याय उपलब्ध असूनदेखील लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि वरदच्या या निर्णयाला आईवडीलांनी खंबीर साथ दिली, व त्याचबरोबर काही कमी रहाणार नाही अशी चोख व्यवस्था केली. आणि या तीनचार वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ आज वरदने मिळवलेल्या दैदीप्यमान यशाने अधोरेखित झाले. यासाठी वरद याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण वरदच्या रुपाने साडवलीतील नलावडे घराण्याचा पहिला प्रशासकीय अधिकारी आज महाराष्ट्राला लाभला आहे हे गौरवास्पद आहे.

मित्रवर्य नलावडे सर यांनी शिक्षण क्षेत्रात व्रतस्थ वृत्तीने विद्यार्जनाचे पवित्र कार्य केले, असंख्य विद्यार्थी घडविले त्याची सर्वोत्तम गुरूदक्षिणा त्यांचा सुपुत्र, शिष्य वरदने हे नेत्रदीपक असे यश मिळवून दिली. असे म्हटल्यास जास्त संयुक्तिक ठरेल. त्याचबरोबर योग्य दिशा व कठोर परिश्रम केल्यास आपलेही तरूण लोकसेवा आयोगाच्या परिक्षा उत्तीर्ण होवू शकतात हा महत्वाचा संदेश वरदने तालुक्यातील तरूणांना दिला आहे. वरदला मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक, आईबाबा,व सर्व कुटुंबियांचे मनपुर्वक अभिनंदन. व वरदला त्याच्या प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button