जनगणना २०२७: सोमवारपासून फील्ड ट्रेनर्स प्रशिक्षण चिपळूणमधून

रत्नागिरी, दि. ५ : जनगणना 2027 च्या अनुषंगाने चिपळूण पंचायत समिती कार्यालयात पहिल्या टप्प्यात उद्या सोमवार दि. 6 ते 8 एप्रिल फील्ड ट्रेनर्स (Field Trainers) यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ उद्या सोमवारी चिपळूण येथे होणार आहे. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा ९ ते ११ एप्रिल असणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी दिली.
प्रशिक्षक म्हणून मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे, राजापूर तहसीलादार विकास गंबरे हे प्रशिक्षण देणार आहेत. जनगणना कार्यालयाचे संजीव गावकर हे जनगणना समन्वय अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये फील्ड ट्रेनर्स यांना जनगणना प्रक्रिया कशी पार पाडावी, मोबाईल ॲपचा प्रभावी वापर कसा करावा, तसेच नागरिकांकडून माहिती संकलन करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य पद्धतीने हाताळणी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल माध्यमाद्वारे करण्यात येणार असल्यामुळे मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक अचूक, जलद व पारदर्शक होणार आहे. त्यानुसार फील्ड ट्रेनर्स यांना तांत्रिक व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणामुळे फील्ड ट्रेनर्स अधिक सक्षम होऊन पुढील जनगणना कार्य प्रभावीपणे पार पाडतील.



