रत्नागिरी

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान १ एप्रिलपासून सुरू; अभियान वर्षभर चालणार

देवरुख दि. २३ (सुरेश सप्रे) :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या उदात्त हेतूने राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान आगामी १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुढील वर्षभर, म्हणजेच ३१ मार्चपर्यंत या अभियानांतर्गत गावोगावी विविध आरोग्यदायी उपक्रम राबवून लोकचळवळ उभी केली जाणार आहे.

या अभियानाचा मूळ गाभा ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध’ हा आहे. केवळ आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी, आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली बदलून ती अधिक आरोग्यदायी करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करणे, या घटकांवर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय पोषण आहार आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून प्रत्येक गाव ‘आरोग्यदायी’ बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

गावांची प्रगती मोजण्यासाठी आरोग्य विभागाने अत्यंत पारदर्शक अशी १०० गुणांची प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये एकूण ५९ विविध आरोग्य निर्देशांकांचा समावेश आहे. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल मृत्यू दरात घट करणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवणे, या निकषांवर गावांचे कठोर मूल्यमापन केले जाईल. ज्या गावांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतील, त्यांना ‘आरोग्य संपन्न गाव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करून गौरविण्यात येईल.

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोठी बक्षिसे जाहीर केली आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गावाला २५ लाख रुपये, विभाग स्तरावर १ कोटी रुपये, तर राज्य पातळीवर अव्वल ठरणाऱ्या गावाला तब्बल ५ कोटी रुपयांचा भव्य पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठीही लाखो आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केवळ गावांनाच नव्हे, तर आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनाही त्यांच्या कामगिरीनुसार स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत.

मूल्यमापन प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर राबवली जाईल. तज्ज्ञांच्या समित्या गावांना प्रत्यक्ष भेटी देतील, दस्तऐवजांची पडताळणी करतील आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून कामाचा दर्जा तपासतील. यामध्ये ग्रामसभांचा सहभाग, स्वच्छता उपक्रम आणि पोषण जनजागृती या बाबींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.

अभियान केवळ आरोग्य विभागाचा सरकारी उपक्रम नसून ती समाजाच्या प्रत्येक घटकाने सहभागी होण्याची एक लोकचळवळ आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी यात १०० टक्के सहभाग नोंदवून आपली गावे आरोग्यसंपन्न करावी असे आवाहनडॉ अनिरुध्द आठल्ये . जिल्हा आरोग्य अधिकारी जि प रत्नागिरी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button