जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा
“टीबी हद्दपार” करण्यासाठी १०० दिवसांचे विशेष अभियान सुरू

रत्नागिरी दि. २४ : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे आज दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ जोत्स्ना वाघमारे,माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात “टीबी हद्दपार” करण्याच्या उद्देशाने १०० दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत सक्रिय रुग्ण शोध, जनजागृती, वेळेवर निदान व संपूर्ण उपचार यावर विशेष भर दिला जाणार आहे.
क्षयरोगाबाबत महत्त्वाची माहिती :
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की – २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहिल्यास विलंब न करता त्वरित तपासणी करून घ्यावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र उपचार नियमित व पूर्ण कालावधीपर्यंत घेणे अत्यावश्यक आहे.
क्षयरोग (TB) म्हणजे :
हवेतून पसरणारा संसर्गजन्य आजार
मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम, परंतु इतर अवयवांनाही होऊ शकतो
प्रमुख लक्षणे :
२ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला
ताप व रात्री घाम येणे
वजन घटणे,भूक मंदावणे
थकवा व अशक्तपणा
थुंकीतून रक्त पडणे
उपचार :
क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो
शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध
उपचार पूर्ण कालावधीपर्यंत नियमित घेणे अत्यावश्यक
“टीबी मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही ग्रामपंचायतींचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८४ ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या असून तालुकानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे –
मंडणगड – १५
दापोली – ५२
खेड – ४६
चिपळूण – ५१
गुहागर – १४
संगमेश्वर – ३९
रत्नागिरी – २९
लांजा – १२
राजापूर – २६
(ही संख्या पुढे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.)
जिल्ह्यातील क्षयरोग रुग्ण सद्यस्थिती :
सध्या १३९० क्षयरोग रुग्ण उपचाराखाली असून सन २०२५ मध्ये १९८९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले
जनजागृती रॅलीचे आयोजन:
कार्यक्रमाच्या शेवटी नर्सिंग विद्यार्थ्यांसह अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरात रॅली काढून नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती केली.
सामूहिक प्रयत्नांची गरज:
जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत “टीबी मुक्त रत्नागिरी जिल्हा” करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले.
“लवकर निदान, नियमित उपचार आणि जनजागृती – यामुळेच क्षयरोगावर मात शक्य” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.



