रत्नागिरी

पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांच्या पदयात्रेने शहर ‘शिवमय’

ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; पोलीस बँडची मानवंदना

रत्नागिरी, दि. १९ :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने आणि पोलीस बँडने दिलेल्या विशेष सलामीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांची युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्काऊट गाईड एनसीसी, एनएसएस यांच्या माध्यमातून ही पदयात्रा काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे महाराजांच्या अर्ध्यपुतळ्यास अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रिती सुर्वे, सायली पाटील, पूजा पवार, निकिता कळंबटे, जागृती पिलणकर, वैभवी खेडेकर, नगरसेवक राजीव कीर, संतोष कीर, विजय खेडेकर आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना श्री. गलांडे म्हणाले, “महाराजांची युद्धनीती, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आजच्या तरुणाईसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून आपण त्या विचारांवर चालले पाहिजे.”

ग्लोबल मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऋत्वी ओसवाल हिने राजमाता जिजाऊंच्या भूमिकेतून प्रभावी विचार मांडले. गोदूताई जांभेकर हायस्कूलचा विद्यार्थी कियांत सोनवले आणि शाळा क्रमांक १९ ची विद्यार्थींनी स्वप्नाली कदम या विद्यार्थ्यांनीही शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षक संपत पाटील यांनी पोवाडा सादर केला.

पोलीस बँडची प्रथमच मानवंदना

मारुती मंदिर येथील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अश्वारूढ पुतळ्यास पोलीस बँड पथकाकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच विशेष सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने वाजवलेल्या धून आणि दिलेल्या सलामीने वातावरण अधिकच मंगलमय झाले. या मानवंदनेने आजच्या सोहळ्यास एक वेगळी उंची मिळाली. वातावरण शिवमय बनले होते.

ऐतिहासिक पेहराव्यातील विद्यार्थी मुख्य आकर्षण

ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर स्टेडियमपासून निघालेली ही पदयात्रा महाराजांचा जयघोष करत मारुती मंदिर चौकात पोहोचली. विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे, कृष्ण, विठ्ठल रखुमाई, प्रभू श्रीरामचंद्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या पदयात्रेची सांगता जयस्तंभ चौक येथे झाली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले. या सोहळ्याला ग्लोबल मराठा हायस्कूल, दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, एनसीसी, एनएसएस, स्काऊड गाईड चे विद्यार्थी आदींसह नगरपरिषद, जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button