देवरुख शहराचा विकास आराखडा तयार
नागरिकांना आराखडा पाहण्यासाठी खुला; हरकती नोंदविण्याचे आवाहन

देवरूख दि. ३१ (सुरेश सप्रे) :- गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेला देवरुख शहराचा विकास आराखडा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन देवरुख नगरपंचायतीच्यावतीने तयार करण्यात आला आहे. कार्यालयात कार्यालयीन वेळेत हा आराखडा नागरिकांना पाहता येणार आहे. नागरिकांच्या काही हरकती असतील तर एक महिन्याच्या आत लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
देवरुख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठीकाण आहे. सर्व सर्व शासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठ देवरुख शहरात आहेत.
याचा विचार करून भू वापर नियोजन, लोकसंख्या वाढ व्यवस्थापन, पायाभूत सुविधा,शिस्तबद्ध विकास, वाहतूक कोंडीसाठी ठोस वाहतूक व्यवस्था. यासर्व उद्देशाने शहर विकास आराखडा तयार केला जातो.
न. पं. कार्यक्षेत्रातील भौगोलिक माहिती जीआयएस प्रणाली वापरून माहिती जीआयएस प्रणाली वापरून तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला होता. प्रारूप विकास आराखडा तयार करून यावर नागरिकांची मते व सूचना देखील नगर रचना अधिकारी स्मिता कलकुटकी, मुख्याधिकारी विसपुते यांनी जाणून घेतल्या होत्या.
नगर पंचायतीत संभाव्य शहर विकास आराखडा प्रकाशित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते.
या आराखड्यात मुख्याधिकारी व कर्मचारी वसाहत, बेघरांसाठी घरे, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह गार्डन, पीकनीक सेंटर. गार्डन, भाजी मार्केट, मच्छी-मटण मार्केट, सार्वजनिक पार्कींग, प्ले ग्राऊंड, चिकन-मटणमच्छी मार्केट, रस्ता रुंदीकरण, फेरीवाल्यांसाठी जागा आदींचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
नगररचनाकार विराज बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विराज बोडस यांना रचना सहाय्यक सुधाकर गजबार व श्रद्धा कांबळे यांचे सहकार्य लाभले.
हा आराखडा नागरिकांना पाहता यावा यासाठी नगरपंचायत कार्यालयात फलकावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा आराखडा कार्यालयीन वेळेत नागरिकांना तो पाहता येणार आहे. नागरिकांच्या हरकती असतील तर १ महिन्याच्या आत लेखी स्वरुपात मांडाव्यात. या हरकतींवर देखील विचार विनियम करण्यात येणार आहे. यानंतरच हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी येणार असल्याचे पाठविण्यात मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी स्पष्ट केले आहे.


