रत्नागिरी

शिल्प साकारताना संयम एकाग्रता महत्त्वाची : शिल्पकार रोहन पवार

सह्याद्री कला महाविद्यालयात शिल्पकलेचे प्रात्यक्षिक

संगमेश्वर दि. २५ ( प्रतिनिधी ):- कोणतेही शिल्प साकारताना संयम आणि एकाग्रता खूप महत्वाची असते. मानवी चेहरे साकारताना ॲनाटोमीचा सखोल अभ्यास आवश्यक आणि महत्वाचा ठरतो. साकारलेले शिल्प जिवंत भासले तरंच त्यात शिल्पकाराचा कस लागल्याचे स्पष्ट होते. यासाठी शिल्पकारांनी दैनंदिन सरावावर भर देवून यातील सखोल ज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन ख्यातनाम युवा शिल्पकार रोहन पवार यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिल्पकलेचे प्रात्यक्षिक दाखवाताना शिल्पकार रोहन पवार हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव, शिल्पकलेचे प्राध्यापक रुपेश सुर्वे, जलरंग चित्रकार विष्णू परीट, सचिनदेव खामकर, प्रा. प्रदीपकुमार देडगे, प्रा. अवधूत खातू, प्रा. विक्रांत बोथरे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रात्यक्षिकासाठी मुंबई येथील चित्रकार प्रकाश महिंदकर यांना शिल्पकार रोहन पवार यांनी मॉडेल म्हणून समोर बसवलं होतं. शिल्पकार रोहन पवार हे सह्याद्री कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आजवर शिल्पकलेत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. रोहन यांची शिल्प ही सामाजिक विषयावर भाष्य करणारी असतात. त्यांच्या शिल्पातून ग्रामीण जीवन अथवा गरिबी याचे दर्शन होते. कोणीही न हाताळलेल्या विषयांवर रोहन शिल्पाकृती साकारत असल्यामुळे त्या अधिक बोलक्या आणि जिवंत भासतात.

समोर मॉडेल बसवल्यापासून साधारणपणे दीड तासात रोहन यांनी शिल्पकलेचे प्रात्यक्षिक पूर्ण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक भाग कसा साकारायचा, ॲनाटोमीच्या अभ्यासानुसार शिल्पात जिवंतपणा कसा आणायचा ? याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शनही केले. यावेळी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी सोप्या शब्दात निरसनही केले. केवळ दीड तासात शिल्पकार रोहन पवार यांनी प्रकाश महिंदकर यांचे हुबेहूब शिल्प साकारले. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात महिंदकर यांचे हुबेहूब शिल्प साकारल्या बद्दल रोहन यांचे अभिनंदन केले.

सह्याद्रीची शिकवण मार्गदर्शक ठरली 

सह्याद्री कला महाविद्यालयात आपण शिल्पकलेचे धडे घेतले. प्रा. रुपेश सुर्वे असोत अथवा कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशशिर्के असोत यांनी आमच्याकडून सातत्यपूर्ण काम करून घेतले. प्रत्येक वेळी शिल्पातील बारकावे समजावून सांगितले. शिल्प साकारताना नवनवीन संकल्पना दिल्या. आता व्यावसायिक शिल्पकार म्हणून काम करत असताना मिळालेल्या यशा मध्ये, सह्याद्री कला महाविद्यालयाची शिकवण कारणीभूत आहे.

– रोहन पवार, प्रसिद्ध शिल्पकार मुंबई

अशा शिल्पकारांचा सह्याद्रीला अभिमान

सह्याद्री कला महाविद्यालयाच्या स्थापनेपासून येथे अनेक शिल्पकार चित्रकार घडले. कोकणच्या ग्रामीण भागातील या हिऱ्यांनी केवळ राज्य नव्हे तर, देश आणि त्या बाहेर आपल्या यशाची पताका फडकवली. शिल्पकार रोहन पवार हे त्यातीलच एक यशस्वी नाव आहे. राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहन पवार यांनी अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. शिल्पकार रोहन पवार यांच्या या यशाचा सह्याद्री कला महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.

– प्रकाश राजेशिर्के, ज्येष्ठ शिल्पकार – चित्रकार सावर्डे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button