
रत्नागिरी दि. १९ : महायुतीतील भाजपाकडून कुवारबाव पंचायत समिती गटात तिकीट नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याने गटातील एकूण ५७ प्रमुख व सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपले राजीनामे तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. हे राजीनामे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण व खासदार श्री. नारायण राणे यांच्याकडे पाठवली जातील, असे प्रतीक देसाई यांनी स्पष्ट केले. मी फक्त स्वीकारतो, असाही त्यांनी मुद्दा स्पष्ट केला.
यापुढे ते फक्त पक्षाचे शुभचिंतक आणि मतदार राहतील, भाजपा पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सहभागी राहणार नसल्याचे राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. कुवारबाव पंचायत समिती गटातील या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित तिकीट मिळाले नाही. यामुळे त्यांचा असंतोष वाढला. महायुतीतील अंतर्गत कलह आणि अन्यायकारक निर्णयांमुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. राजीनामे सुपूर्द करताना पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेचे पुढील परिणाम काय असतील, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कुवारबाव मधील या घटनेमुळे तालुक्यातील राजकारणात नवीन चक्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



