महाराष्ट्ररत्नागिरी

हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करा, जयगड बंदर प्रकल्पाला गती द्या : राणे

मुंबई दि. ७ :- कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक झाली.

कोकणातील शेतकऱ्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे असून या बंदरातून निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखत कामे गतीने व दर्जेदार करावीत. कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतसाखळी व्यवस्था, तपासणी प्रक्रिया, वाहतूक साखळी तसेच बंदरांमधील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत नितेश राणे यांनी सुचित केले. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा व काजू उत्पादन होते, तर कोकणातील हापूस आंब्याला जागतिक स्तरावर विशेष मागणी आहे. मत्स्यव्यवसायही कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे या सर्व उत्पादनांना थेट परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी निर्यात प्रकल्पाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शेतकरी आणि मत्स्य व्यवसायिकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळण्यासाठी निर्यात व्यवस्था सक्षम होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून, मंत्री राणे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्यक्ष निर्यात प्रक्रिया सुरू होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. काजू उत्पादक, हापूस आंबा उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांमध्ये या प्रकल्पाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी केल्या. कोकणातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल आणि संपूर्ण कोकणाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोकणाच्या भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून पुढील काळात तो राज्याच्या निर्यातवाढीसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजनबद्ध आणि वेगवान पद्धतीने काम करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button