रत्नागिरी

वेळेवर, संपर्क न करता जनतेला सेवा दिली तर जनतेसाठी सुशासन

सर्व सेवा ऑनलाईन देण्याचा निर्धार करा - राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव

रत्नागिरी, दि. १४  : जनतेला सुशासन द्यायचे असेल तर त्यांना संपर्क न करता, ती सेवा वेळेवर मिळायला हवी. त्यासाठी विहित कालावधीत, संपर्क विरहीत आणि सर्व सेवा ऑनलाईन देण्याचा निर्धार करा, अशी सूचना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयुक्त श्री. श्रीवास्तव यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितिन बगाटे उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री. श्रीवास्तव म्हणाले, जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये यामध्ये पुढाकार घेऊन शिबिरे घ्यावीत. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले जाग्यावर द्या. शासन स्वत:हून आपल्यापर्यंत आले आहे, याचे समाधान त्यांना लाभेल. ज्या सेवा ऑफलाईन आहेत अशा अर्जांना ऑनलाईनमध्ये रुपांतर करा. त्यानंतरची प्रक्रिया देखील ऑनलाईन झाली पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तितकीच प्रभावी जनजागृती करा. कार्यालयीन तपासणी केल्यानंतर दिसून आलेली उणीव, विभाग प्रमुखाच्या लक्षात आणून‍ दिली पा‍हिजे. त्यासाठी पथक निर्माण करा. प्रमुख कार्यालयांनी डिजीटल डिस्प्ले करा. गर्दीच्या ठिकाणी फलक लावून प्रचार करावा. ग्रामपंचायतींमध्ये, आपले सरकार सेवा केंद्राकडून सर्व सेवा दिल्या जातात का, अशा केंद्रांवर योग्य वागणूक मिळते का, जादा शुल्क आकारणी होते का, याची तपासणी व्हायला हवी.

आपले सेवा केंद्राचे ब्रॅण्डींग व्हायला हवे

जिल्ह्यातील सर्व आपले सेवा केंद्रांचे ब्रॅण्डींग व्हायला हवे. गणवेश त्यावर बोधचिन्ह असावे. केंद्राबाहेर स्टँडी हवी त्यावर पोर्टलला लिंक करणारा, तक्रारींसाठी आणि सर्व सेवांची माहिती देणारा असे तीन क्युआर कोड असायला हवेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात घरपोच सेवा देण्यात येत आहे, ही अतिशय चांगली बाब आहे. याची पुनरावृत्ती सर्व ठिकाणी करावी. राईट टू सर्व्हिस याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी, आयुक्तांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे, अपेक्षांची पूर्तता केली जाईल. सेतू तसेच सेवा केंद्र हे निश्चितपणाने पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर आदर्श बनविले जातील, असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button