कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन
१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे होणार साहित्य संमेलन; ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण तानाजीराव चोरगे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड

रत्नागिरी दि. ९ :- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण तानाजीराव चोरगे यांची एकमताने संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक ॲड. दीपक पटवर्धन, गजानन पाटील, जयवंत जालगांवकर, राजेंद्र सुर्वे, संयोजन समितीचे अरुण इंगवले, धीरज वाटेकर, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. देशपांडे म्हणाले की, या संमेलनाच्या उद्घाटनासाठी खा. शरदचंद्र पवार, ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, ना. उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच समारोपला मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, ना. अजितदादा पवार -उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक मा. सदानंद मोरे यांचे सह या संमेलनाला महाराष्ट्रातून साहित्यिक, प्रगतशील शेतकरी, सहकारातील कार्यकर्ते, कृषी तज्ञ इत्यादी हजर असणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.
ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन ही प्रथमच नवीन संकल्पना आहे. अनेक ग्रामीण, कृषी व सहकार या विषयाचे नामवंत लेखक या संमेलनात भाग घेणार आहेत. तसेच महाराष्ट्रातून हजारो शेतकरी येणार आहेत. ग्रामीण साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेरील साहित्यप्रेमी येणार आहेत. पुस्तक प्रदर्शन, इत्यादि सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे संमेलन आहे.



