रत्नागिरी

लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधी ऐतिहासिक मोर्चा

खेड दि. ९ :-  “बंद करा! बंद करा! लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा”, “कोण म्हणतंय होणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही” अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण औद्योगिक परिसर आज सकाळी दणाणून गेला होता.

लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमुळे पीफास रसायनातून निर्माण होणाऱ्या आरोग्य व पर्यावरणीय धोक्याविरोधात संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता भव्य व ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले. “बंद करा! बंद करा! लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा”, “कोण म्हणतंय होणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही” अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण औद्योगिक परिसर दणाणून गेला होता.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. महामार्गापासून कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. मोर्चा गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी तो अडवून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला कंपनी प्रशासनाशी चर्चा करण्याची परवानगी दिली.

शिष्टमंडळाने कंपनीकडे निवेदन सादर करून गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत सांगितले की, कंपनी प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सर्व प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली, तसेच कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी उपस्थित नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही संपूर्ण वेळ अनुपस्थित राहिले.

या प्रकारामुळे प्रशासनाला कोकणवासीयांच्या आरोग्याची, पिण्याच्या पाण्याची आणि पर्यावरणाची कोणतीही चिंता नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘कोकणातील निसर्गसौंदर्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प चालू देणार नाही’ असे स्पष्ट वक्तव्य केले असतानाही कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती अधिकच आश्चर्यकारक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी नागरिकांमधील संताप आणि चिंता स्पष्टपणे जाणवत होती. संघर्ष समितीने इशारा दिला की, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button